Sun, Jul 21, 2019 16:36
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › आ. फर्नांडिस यांचा ‘ग्रेटर पणजी पीडीए’ सदस्यत्वाचा राजीनामा 

आ. फर्नांडिस यांचा ‘ग्रेटर पणजी पीडीए’ सदस्यत्वाचा राजीनामा 

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

सांताक्रूज   मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपणास मतदारांनी  निवडून दिले असून  आपण लोकांबरोबर राहणार आहे. सांताक्रुज व शेजारील भागाचा ‘ग्रेटर पणजी पीडीए’मध्ये समावेश लोकांना जर नको असेल तर आपण सदर पीडीएच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहोत. तसेच सदर पीडीएची अधिसूचना रद्द  करावी, अशी मागणी विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे  आमदार अंतोनिओ फर्नांडिस यांनी रविवारी जाहीर केले.

‘ग्रेटर पणजी पीडीए’मध्ये सांताक्रुजचा समावेश करण्यास विरोध करण्यासाठी  सांताक्रुज, मेरशी, चिंबल, कुडका व बांबोळी शेजारील भागातील  लोकांनी मोठ्या संख्येने हजर राहून गावात शांतापूर्ण मार्गाने मेणबत्ती रॅली काढली. या रॅलीनंतर  कालापूर चर्चजवळील मैदानात सभा घेण्यात आली.  या सभेत बोलताना फर्नांडिस म्हणाले, की सांताक्रुज व शेजारील भागाचा    ‘ग्रेटर पणजी पीडीए’मध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय आपणाला विश्‍वासात न घेता घेण्यात आला आहे.

आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही सदर पीडीएबाबत अंधारात ठेवण्यात आले आहे. सांताक्रुजमधील  बोंडवाल तळे, शेती, भाट, डोंगर यांना सदर पीडीएच्या विकासात समावेश  करण्यात आले आहे.  हे बदलून सांताक्रुज मुळ  रूपात आणण्यासाठी अधिवेशनात पीडीएची अधिसूचना मागे घेण्याची मागणी करणार आहे. रूडॉल्फ फर्नांडिस म्हणाले, की आपण आणि माजी आमदार व्हीक्टोरिया फर्नांडिस सांताक्रुजच्या लोकांबरोबर राहणार आहोत.  आमदार फर्नांडिस यांनी दोन्ही बाजूकडे झूकण्या ऐवजी एक ठाम मत घ्यावे. गरज पडल्यास या प्रश्‍नावर जनमत कौल घेण्यास हरकत नाही. या कौलासाठी जो काही खर्च लागेल तो सर्व खर्च उचलण्याची आपली तयारी आहे. 

‘पीडीए’ची पीडा नको 

या सभेला कुडका, बांबोळी, तळावली, मेरशी , सांताक्रुज, चिंबल आदी ग्रामपंचायतींचे पंचायत सदस्य सभेला उपस्थित राहून  पीडीए विरोधाला आपला पाठिंबा दिला. कालापूर चर्चपासून निघालेला  मेणबत्ती रॅली  सांताक्रुज गावातून मेरशी जंक्शनपर्यंत नेण्यात आल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. सभेत महिलांचा व लहान मूलांचा  सहभाग होता.   उपस्थित लोकांनी ‘पीडीएची पीडा आम्हाला नको’,‘आमच्या मागण्या पूर्ण करा’ असे फलक आणून घोषणा दिल्या.