Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Goa › पणजीत कर्मचार्‍यांचा मोर्चा 

पणजीत कर्मचार्‍यांचा मोर्चा 

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 31 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी

वेतनवाढीच्या मागणीसाठी  बँक कर्मचार्‍यांनी  पुकारलेल्या दोन दिवसीय संपात गोव्यातील बँक कर्मचारीही सहभागी झाले आहेत. या कर्मचार्‍यांनी बुधवारी शहरात मोर्चा काढून मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी बेमुदत संपावर जाऊ, असा इशारा गोवा बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  सुभाष नाईक जॉर्ज यांनी यावेळी दिला.

जॉर्ज म्हणाले, युनायटेड  फोरम ऑफ बँक युनियनतर्फे देशभरातील बँक कर्मचार्‍यांनी बुधवारी व  गुरुवारी 31 मे रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. यात गोव्यातील  सुमारे 5 हजारांहून अधिक  बँक  कर्मचारी सहभागी झाले आहेत. 2017 पासून सरकार तसेच  भारतीय बँक असोसिएशनकडे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बँक कर्मचार्‍यांना   केवळ 2 टक्के पगारवाढ दिली. तर गतवर्षी 15 टक्के वाढ दिली होती. बँक कर्मचार्‍यांवर हा अन्याय असून त्याच्या निषेधार्थ हा संप पुकारला आहे. गोव्यातील सर्व खासगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी या संपात   सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले. बँक कर्मचार्‍यांकडून पणजी येथील आझाद मैदानावर सभेचे आयोजन केले होते. यात   विविध मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला.त्यानंतर    आझाद मैदान परिसरात  या कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला. यात सुमारे  500 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.