Mon, Apr 22, 2019 04:10होमपेज › Goa › दोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद

दोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 1:41AMपणजी : प्रतिनिधी

गोव्याला भेट देणार्‍या जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेली दोनापावला जेटी आता एका बाजूने बंद करण्यात येणार आहे. सदर जेटीचे बांधकाम जीर्ण  झाले असून  ते पर्यटकांना धोकादायक ठरण्याची भीती  प्रशासनाने व्यक्त केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत जेटीकडे जाणारा रस्ता बंद करण्यास मान्यता दिली  असून तसा आदेश गुरुवारी(आज) जारी करण्यात येणार आहे, असे  त्यांनी सांगितले.  राजधानीपासून अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या दोनापावला जेटीवर दिवस-रात्र पर्यटकांची गर्दी असते. खार्‍या पाण्याच्या सततच्या मार्‍याने या जेटीखालील लोखंडी सळ्या गंजल्या असून अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे तुकडे पडलेले आहेत.  जेटीवरील लोखंडी कठडे आणि विजेचे शोभिवंत दिवेही कोसळले असून 
बाकडीही मोडकळीस आलेली आहेत. 

या जेटीच्या सक्षमतेबद्दल 2015 साली गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणात जेटीची एक बाजू पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असून ते बांधकाम मोडून नव्याने बांधण्याची गरज असल्याचे नमूद  केले होते. पणजीच्या विकासासाठी स्थापन केलेल्या ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी  लि.’ कडे हा अहवाल पोहचला असून आता या जेटीचे काम केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.  मोहनन म्हणाल्या, की   ‘जीएसआयडीसी’ ने जेटीसंदर्भात दिलेल्या अहवालावर बैठकीत चर्चा करण्यात आली. जेटीकडे  जाणार्‍या एका बाजूचा पूल आणि काही भाग हा कमकुवत झाला असून तो पर्यटकांना तसेच स्थानिकांसाठी धोकादायक आहे.  यासाठी या भागात जाणारा रस्ता फेब्रुवारी महिन्यात कधीही बंद केला जाऊ शकतो. याबाबत  गुरुवारीच आदेश काढला जाणार आहे. 

फेरीवाल्यांना 7 दिवसांची मुदत

जेटीचा भाग बंद करण्यापूर्वी या आदेशाचा परिणाम होणार्‍या सर्व  फेरीवाल्यांना  7  दिवसांची तात्पुरत्या स्थलांतरासाठी मुदत दिली जाणार आहे. मनपाकडून या फेरी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र  व्यवस्था केली जाणार आहे. या भागाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू होणार आहे.  जलक्रीडांवर या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे जिल्हाधिकारी  मोहनन यांनी सांगितले.