Wed, Jul 17, 2019 20:39होमपेज › Goa › माहितीपट भारतीयांपर्यंत प्रभावीपणे पोहचावेत

माहितीपट भारतीयांपर्यंत प्रभावीपणे पोहचावेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

भारतीय  माहितीपट फार चांगल्या विषयांवर आधारित असतात. परंतु हे  माहितीपट भारतीय जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना लोकप्रियता मिळत आहे.  भारतीयांपर्यंत  माहितीपट प्रभावीपणे  पोहोचवणे  गरजेचे आहे,असे मत  चित्रपट दिग्दर्शक सुप्रियो सेन यांनी व्यक्त केले. 

‘इफ्फी’त इंडियन पॅनोरमातील नॉन फिचर चित्रपट  विभागातील ‘दिग्दर्शकांशी संवाद’ च्या पत्रकार परिषदेत ‘अवर ग्रँड पॅरेंट्स होम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक  सुप्रियो सेन बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ‘एपिल’ चे दिग्दर्शक आर. के. सोरेन व विनोद कुमार उपस्थित होते.  

सुप्रियो सेन म्हणाले, भारत- पाकिस्तान फाळणी च्या वेळी 15 कोटी लोकांनी एका देशातून दुसर्‍या देशात स्थलांतर केले. त्यात कित्येक लोक मरणही पावले. परंतु त्यावेळी झालेली प्रत्येक गोष्ट म्हणजे आपली आठवण आहे व आजच्या पिढीपर्यंत आपल्या आठवणी पोचायला हव्यात, या  उद्देशाने आपला प्रत्येक चित्रपट ‘फाळणी’ संदर्भातील कथांवर बेतलेला असतो.  फाळणीच्या वेळी  हिंसा, हत्या, अत्याचार  अशा अनेक हालअपेष्टांना  लोकांना सामोरे जावे लागले व यासंदर्भातील अनेक गोष्टी पालकांकडून बालपणीच ऐकून मोठा झाल्याने  अशाच विषयांवर चित्रपट बनविण्याची कल्पना सुचली,असेही सेन म्हणाले.

 सुप्रियो सेन यांचा पहिला चित्रपट ‘वे बॅक होम’ हादेखील फाळणीवर आधारित आहे. अशा चित्रपटांमुळे लोकांच्या भावना दुखावतात वगैरे म्हटले जाते परंतु फाळणी संदर्भातील आपला चित्रपट बांगलादेश, पाकिस्तान व भारतात लोकांना प्रचंड आवडला. सेन यांचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट फाळणीवर आधारित आहेत. इफ्फीशी खुप वर्षांपासूनचे आपले नाते आहे व गतवर्षी ‘वाघा’ या चित्रपटाला इफ्फी त पुरस्कार प्राप्त झाला असल्याचेही  सेन यांनी सांगितले. आर. के. सोरेन म्हणाले, इफ्फी त प्रदर्शित ‘एपिल’ ही एका मुलीची कथा आहे. गावात निधी गोळा करण्यासाठी एपिल ही मुलगी वडिलांच्या देहांतानंतरही कशा प्रकारे स्वत:ला सावरून गावाच्या कल्याणासाठी काम करते ते या चित्रपटात दाखवले आहे.