Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Goa › टूरिस्ट टॅक्सी मालकांचे आज ‘जेल भरो’

टूरिस्ट टॅक्सी मालकांचे आज ‘जेल भरो’

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:59AMपणजी : प्रतिनिधी

स्पीड गव्हर्नर व डिजिटल मीटर बसवण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालकांनी शुक्रवारी राज्यव्यापी बेमुदत संपाला सुरुवात केली. या संपामुळे राज्यात दाखल होणार्‍या पर्यटकांचे  काही प्रमाणात हाल झाले. मात्र, सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी बसेसची व्यवस्था केल्याने संपाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. दरम्यान, सरकार जोवर लेखी आश्‍वासन देत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवला जाईल, असे सांगून  शनिवारी (दि.20) मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करू, असा इशारा  राज्यातील पर्यटक टूरिस्ट टॅक्सी मालकांनी दिला. संपाच्या पार्श्‍वभूमीवर टॅक्सी मालकांनी पणजी येथील आझाद मैदानावर शक्‍तिप्रदर्शन केले.

यावेळी  दोन हजारांहून अधिक टूरिस्ट टॅक्सी मालक उपस्थित होते. यावेळी   मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात केल्याने आझाद मैदान परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. टूरिस्ट टॅक्सी मालकांच्या संपामुळे  राज्यात आलेल्या पर्यटकांचे मात्र हाल झाले. संपाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून  अतिरिक्‍त  टॅक्सींची तसेच बसेसची सोय करण्यात आली होती. मात्र, तरीही पर्यटकांना त्रास सहन करावा लागला. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास टॅक्सी मिळत  नसल्याचे चित्र पहायला मिळत होते. टॅक्सी मालकांनी शनिवारी (दि.20) पुन्हा आझाद मैदान येथे  सकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने जमावे. शक्य झाल्यास कुटुंबीयांनाही  सोबत आणावेे, असे उत्तर गोवा टूरिस्ट टॅक्सी मालक संघटनेचे  प्रवक्‍ते बाप्पा कोरगावकर म्हणाले.

सरकारने लेखी आश्‍वासन द्यावे, आम्ही संप मागे घेतो. आता ‘करो या मरो’ची भूमिका टॅक्सी चालकांनी स्वीकारली आहे. स्पीड गव्हर्नर सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्देशानुसार वाहनांना बसवण्यात येत असल्याचे सरकार म्हणत आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले असल्यास त्याची प्रत सरकारने आम्हाला दाखवावी. राज्यातील 20 हजारहून अधिक टुरिस्ट टॅक्सी मालकांच्या पोटाचा हा प्रश्‍न आहे. त्यांच्या भावनांशी सरकारने खेळू नये.  सरकारने  तसा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही यावेळी कोरगावकर यांनी दिला. स्पीड गव्हर्नर  व डिजीटल मीटरला विरोध करण्यासाठी राज्यातील  टुरिस्ट टॅक्सी मालकांनी  शुक्रवारपासून संपास सुरुवात केली आहे.

यात राज्यभरातील 20 हजार टुरिस्ट टॅक्सी मालक सहभागी झाले आहेत.  टुरिस्ट टॅक्सी मालकांना पाठींबा देण्यासाठी सकाळपासून राजकीय नेते आझाद मैदानावर दाखल  झाले. यात उपसभापती मायकल लोबो, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, विरोधी पक्षनेते काँग्रेसचे बाबू कवळेकर, आमदार रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, चर्चिल आलेमाव, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, तसेच आम आदमी पक्षाचे नेते एल्वीस गोम्स, अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे पदाधिकारी सुदीप ताम्हणकर यांनी आझाद मैदानावर उपस्थिती लावली.  मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर  येणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी  उपसभापती लोबो यांना पाठवले.   स्पीड गव्हर्नर व  डिजिटल मीटरप्रश्‍नी    केवळ तोंडी आश्‍वासन नको तर लेखी आश्‍वासन हवे. तोंडी आश्‍वासनांचा आम्हाला कंटाळा आला आहे, असे म्हणत व्यासपीठावरून बोलणार्‍या उपसभापती लोबो यांना टुरिस्ट टॅक्सी मालकांनी  हुश्शा घालून व्यासपीठावरून खाली उतरा, अशा घोषणा दिल्या.