होमपेज › Goa › काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे विधानसभेत अभिनंदन

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे विधानसभेत अभिनंदन

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 15 2017 10:44PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याबद्दल शुक्रवारी सभागृहाने त्यांचा एकमताने अभिनंदन ठराव मंजूर केला. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी हा ठराव सभागृहात मांडला, असता त्याला काँग्रेस आमदारांनी पाठिंबा दिला. कवळेकर म्हणाले, राहुल गांधी हे एका कार्यकर्त्याप्रमाणे वावरून मोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत.  भाजपतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, की ही अशी एक  घटना म्हणावी लागणार आहे, ज्यामुळे घराणेशाहीचे एक वर्तुळ आणखी एकदा पूर्ण झालेे.

आमदार लुईझिन फालेरो यांनी राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणे ही घटना भारतीयांसाठी व विशेषतः गोमंतकीयांसाठी अभिमानाचे असल्याचे सांगितले. गोमंतकीय आणि गांधी- नेहरू कुटुंबीयांचा घनिष्ठ नाते आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्तीसाठी भारतीय सैनिकांची कुमक पाठवून मदत केली होती, असे त्यांनी सांगितले. आमदार इजिदोर फर्नांडिस म्हणाले, की देशातील सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणे हे आव्हानात्मक आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी आणि गरीबांसाठी अनेकवेळा बलिदान दिले आहे. राहुुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनणे हे आमच्यासाठी आनंददायी आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा आपले गतवैभव मिळवेल, असा विश्‍वास आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी व्यक्त केला. अभिनंदनाचा  ठराव एकमताने मान्य करण्यात आला.