होमपेज › Goa › गोव्यात उरल्यासुरल्या सेनेची पडझड

गोव्यात उरल्यासुरल्या सेनेची पडझड

Published On: Mar 04 2018 1:24AM | Last Updated: Mar 04 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

शिवसेना राज्यप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याचे जाहीर झालेले शिवसेना राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांनी आपण अन्य 23 पदाधिकार्‍यांसह शिवसेनेचा राजीनामा दिल्याचे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सर्वांनी सामूहिक राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. जोशी यांना पदावरून हटवण्यात आल्याने शिवसेनेच्या 23 पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे देत असल्याचे पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोशी यांना राज्यप्रमुख पदावरून हटवण्याबाबतचा आदेश शुक्रवारी (दि. 2) रात्री उशिरा दिला होता.

शिवप्रसाद जोशी म्हणाले की, गोवा शिवसेनेने  मागील अडीच वर्षांत  चार राज्यप्रमुखांना सदर पदावरुन हटवले आहे. रमेश नाईक, अ‍ॅड. अजितसिंह राणे, सुदीप ताम्हणकर यांच्यानंतर आता आपणास हटवले आहे. शिवसेनेत दोन राज्यप्रमुख पदे निर्माण करुन राज्यप्रमुखपदी आपण असताना जितेश कामत यांची सदर  पदी नियुक्‍ती करण्यात आली. या गोष्टीविरोधात बंड होईल, ही बाब लक्षात येताच राज्यप्रमुख पदावरून आपल्याला हटवण्यात आले. 

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पटल्यानेच आपण शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, अशा प्रकारे हकालपट्टी करणे योग्य नाही. पक्षाचा एक रुपयाही आपण खाल्‍ला नाही, असे असून पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला. नव्या लोकांना पक्षात प्रवेश देऊन पक्षासाठी काम करणार्‍या  पक्षाच्या जुन्या  कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून पक्षाचे विविध तालुका प्रमुख तसेच पदाधिकारी मिळून  23  जणांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

उषा नाईक देईकर म्हणाल्या, पक्षाचे काम करण्यास काही नेतेच अडचणी निर्माण करतात. पक्षातून काढून टाकू, अशा धमक्या देतात.  पक्षात नव्यानेच दाखल झालेल्या व पक्षाविषयी फारसे काहीच माहिती नसलेल्या अशा मंडळींकडून जुन्या कार्यकर्त्यांना काम करण्यास दिले जात नाही. हे सर्व षडयंत्र असून राखी नाईक प्रभूदेसाई व राज्यप्रमुखपदी नियुक्‍ती करण्यात आलेल्या जितेश कामत यांना पक्षातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

राजीनामा दिलेले फोंडा तुलका प्रमुख राजेंद्र मणेरकर, धारबांदोडा प्रमुख शैलेेंद्र सिंग, शहर प्रमुख  घनःश्याम नाईक, कार्यकारिणीचे सदस्य संदीप शिरवईकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद सांगेकर, मीडिया कक्षाचे प्रमुख विर्डीकर, सांगे तालुका प्रमुख हिमेश कासार्डेकर, सांगे तालुका प्रमुख  विनेश प्रभूदेसाई, दक्षिण गोवा महिला अध्यक्ष उषा नाईक देईकर, तिसवाडी तालुका प्रमुख  आनंद मांद्रेकर, पेडणे तालुका प्रमुख  शंकर परब यांच्यासमवेत कुडचडेचे तालुका प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.