होमपेज › Goa › कोळसा प्रदूषणप्रश्‍नी तीन महिन्यांत तोडगा

कोळसा प्रदूषणप्रश्‍नी तीन महिन्यांत तोडगा

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 16 2017 12:30AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोवा हे देशातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र असल्याने कोळसा प्रदूषण राज्याला परवडणारे नाही. गोव्याबाबत काही घटकांकडून गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र रचले जात असून ‘एमपीटी’तील कोळसा हाताळणी प्रकल्पाचा विस्तार होऊ देणार नाही. येत्या तीन महिन्यांत म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत कोळसा प्रदूषण प्रश्‍नावर तोडगा काढू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. 

एमपीटी बंदरात होत असलेल्या कोळसा हाताळणीमुळे प्रदूषण होत असल्याबद्दल फोंड्याचे आमदार  रवी नाईक यांनी शुक्रवारी खासगी ठराव आणला होता. या ठरावावेळी विरोधी सर्व काँग्रेस आमदारांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड  यांनी  केंद्रात तत्कालीन भाजप सरकार असतानाच कोळसा हाताळणीचा परवाना दिला असल्याचा आरोप केला. विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढून मुख्यमंत्री पर्रीकर सुमारे दीड तास बोलले. नाईक यांचा खासगी ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला. 

आपण केवळ आपल्या राज्याचा विकास साधण्यासाठी केंद्रातील महत्त्वाचे पद सोडून परत आलो आहोत, असे सांगून पर्रीकर म्हणाले की, गोव्याला अप्रतिम  निसर्गसौंदर्य  लाभले  असून पर्यटन व्यवसायप्रधान असे हे राज्य आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी पर्यावरणाला पूरक  वातावरण राज्यात असणे गरजेचे आहे. राज्यातील पर्यटन तीन पटीने वाढले असून, 2012 साली केवळ 26 लाख असणारी पर्यटकांची संख्या आता यंदा 80 लाखांवर जाणार आहे. कोळसा हाताळणीतून निर्माण होणार्‍या प्रदूषणाला आपलाही विरोध आहे. मात्र, काही घटकांकडून राष्ट्रीय पातळीवर गोव्यात प्रदूषण होत असल्याने ते चांगले पर्यटनस्थळ नाही, असा अपप्रचार होत आहे, असेही ते म्हणाले.    

गोव्याची प्रतिमा बिघडवण्याचे कोणीतरी षडयंत्र रचत आहे. मात्र विरोधक आणि स्वयंसेवी संघटना ही बाब लक्षात घेत नाहीत. मांडवी व झुवारी सारख्या महत्वाच्या पुलांबाबत न्यायालयात जाऊन अडवणूक केली जाते. कोळसा प्रदूषणाचा प्रभाव  केवळ 2-3 मतदारसंघांतच असून वास्को शहराच्या दोन किलोमीटर्स परिघातच त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, पर्यटन क्षेत्रातील काही स्पर्धक राज्यांनी याच प्रदूषणाचा मुद्दा बनवून सर्व राज्यभर कोळशाचा धुरळा पसरत असल्याचे फसवे चित्र तयार केले आहे. कोळशा विरोधात आंदोलन करणार्‍यांपैकी फक्त दोघेच जण वास्कोत राहणारे असून अन्य  लोकांना प्रदूषणाचा फटका बसणे शक्यच नसल्याचे पर्रीकर म्हणाले. 

पर्रीकर म्हणाले की, गोवा दरसाली 72 लाख टन ‘कार्बन डाय ऑक्साईड’ तयार होतो. राज्याच्या शहरांतील प्रदूषणाची मात्रा पाहता आज वास्कोमधील प्रदूषणापेक्षा म्हापसा  शहरात अधिक प्रदूषण असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालातून सिद्ध होत आहे. हे प्रदूषण वाहनातील इंधनामुळे होत असल्याने आधी आपण वाहनांचा आणि वातानूकुलन यंत्रांचा वापर कमी करणे आवश्यक आहे.