होमपेज › Goa › पणजीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

पणजीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Published On: Dec 19 2017 1:57AM | Last Updated: Dec 19 2017 12:33AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गुजरात व हिमाचलमधील विजयाचा जल्लोष करण्यासाठी पणजीतील भाजप कार्यालयासमोर सोमवारी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली. भाजपच्या विजयाच्या घोषणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजप मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित होते.  माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले, गुजरात, हिमाचलमधील विजयाचे सारे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजप कार्यकर्त्यांना जाते. हा विजय भाजपसाठी ऐतिहासिक आहे. अनेक विषय घेऊन लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे विरोधकांचे मनसुभे जनतेने उधळले.

भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर म्हणाले, गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपचा विजय निश्‍चित होता. भाजपने केलेल्या विकासकामांची ही जनतेने दिलेली पोहोचपावती आहे. नगरसेवक शुभम चोडणकर यांनी भाजपचे काँग्रेसमुक्त भारताचे लक्ष्य पूर्ण होणार असल्याचे सांगून त्यांनी दोन्ही राज्यांतील भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. पणजी महिला मोर्चा अध्यक्ष वनिता भिंगी, नगरसेवक शेखर देगवेकर यांनी यावेळी विचार व्यक्त केले.