Sun, Jul 21, 2019 01:37होमपेज › Goa › गोमांस विक्रेत्यांचा बेमुदत बंद

गोमांस विक्रेत्यांचा बेमुदत बंद

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:58AM

बुकमार्क करा
पणजी/मडगाव : प्रतिनिधी

परराज्यांतून गोव्यात गोमांस घेऊन येणार्‍या वाहनांवर विनाकारण पोलिसांकडून केल्या जाणार्‍या कारवाईमुळे मांस विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचा निषेध म्हणून शनिवारपासून राज्यातील मांस विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. सरकार या प्रश्‍नी तोडगा काढत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवली जातील, असा इशारा गोवा मांस विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी दिला आहे. मडगावातही मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या संंख्येने आलेल्या ग्राहकांंची गैरसोय झाली. बीफसाठी दुकानदारांनी आगाऊ ऑर्डर स्वीकारल्या असल्याने काही संतप्त ग्राहकांनी फातोर्डा मासळी बाजार व गांधी मार्केटमध्ये गोंधळ घातला. 

राज्यातील सुमारे शंभरहून अधिक गोमांस विक्रीची दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली. राज्य सरकार या प्रश्‍नी तोडगा काढेपर्यंत गोमांस विक्री दुकाने बंदच ठेवली जातील, असे मन्ना बेपारी यांनी सांगितले. ते म्हणाले, उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प काही वर्षांपासून बंद असल्याने मांस विक्रेते परराज्यातून गोमांस आणून त्याची गोव्यात विक्री करतात. 
    
‘आत्तापर्यंत 2800 किलो गोमांस जप्त’

परराज्यांतून गोमांस आणण्यासाठी लागणारे कायदेशीर परवाने व्यापारी घेतात. मात्र, गोव्यातील बिगर सरकारी संघटनांकडून (एनजीओ) गोव्यात आणले जाणारे गोमांस बेकायदा असल्याची खोटी तक्रार पोलिसांत करतात. या तक्रारींच्या आधारे पोलिसांकडून गोमांस वाहतूक करणार्‍या चालकांवर कारवाई केली जाते. अशाप्रकारे कारवाई करून काही दिवसांपूर्वी पणजीतून 1300 किलो आणि शुक्रवारी (दि.5) वाळपई येथे 1500 किलो  गोमांस पोलिसांनी जप्त  केले होते. अशी माहिती मन्ना बेपारी यांनी दिली.

कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून गोव्यात आणले जाणारे गोमांस बेकायदा ठरवून पोलिस कारवाई करत असल्याने मांस विक्रेत्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारने या प्रश्‍नी ठोस आश्‍वासन देऊन तोडगा काढावा, उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प तत्काळ सुरू करावा, अशा मागण्या मांस विक्रेत्यांनी सरकारकडे केल्या आहेत, असे बेपारी यांनी सांगितले.  सध्या बंद पाडलेले फोंडा येथील मांस कॉम्प्लेक्स पूर्वी लिंडन मोंतेरो यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून हे कॉम्प्लेक्स पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी बीफ व्यावसायिक निजामुद्दीन बेपारी यांनी केली.