होमपेज › Goa › बालरथ चालकांना मालक बनवण्याची योजना 

बालरथ चालकांना मालक बनवण्याची योजना 

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 15 2017 10:41PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

 बालरथ कामगारांना पगारवाढ देण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनाची असून  सरकारची नाही,असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  विधानसभेत  शुक्रवारी शून्य तासावेळी स्पष्ट केले.  बालरथ   बस चालकांना बालरथचा मालक होण्याची संधी सरकार मुख्यमंत्री रोजगार योजनेव्दारे देईल, शाळांनी मग या बसेसची सेवा घ्यावी.  या संबंधीची योजना येत्या  अर्थसंकल्पा पर्यंत तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बालरथ कामगारांना  सेवेत कायम करण्याबरोबरच  त्यांना पगारवाढ देण्यात यावी,अशी मागणी करून  याप्रश्‍नी  आमदार लुईझिन फालेरो  यांनी शून्य तासावेळी सरकारचे लक्ष वेधले असता  पर्रीकर यांनी  वरील बाब स्पष्ट केली.

आमदार फालेरो म्हणाले,  बालरथ बसेसवर 400 हून अधिक चालक तसेच सहाय्यक कामावर आहेत. यापैकी चालकांनी दरमहा 10 हजार रुपये तर अटेंडंटना  प्रती महा 5 हजार रुपये इतका  अल्प पगार मिळत आहे. या कामगारांच्या प्रश्‍नाकडे सरकारने लक्ष देऊ न त्यांना पगारवाढ द्यावा अशी मागणी केली.

 मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले,  बालरथ कामगार हे पुर्णवेळ कर्मचारी  नाहीत. ते दिवसातून केवळ 3 ते 4 तास काम करतात. सरकारकडून शाळांना त्यांना पगार देण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र याचा अर्थ असा होत नाही, की त्यांना पगार देण्याची जबाबदारी सरकारची नाही.  त्यांना मध्यंतरी 500 रुपये ते  1 हजार रुपये इतकी पगार वाढ देण्यात आली  होती. सरकारचा त्यांच्यांशी संबंध नाही.  बालरथ कामगारांना पगारवाढ देण्याची जबाबदारी ही संबंधीत शाळा व्यवस्थापनाची आहे, सरकारची नाही.त्यांना सरकारने नोकरीत ठेवलेले नाही,असेही  त्यांनी सांगितले.