Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Goa › विधानसभा, लोकसभा एकाचवेळी घ्याव्यात

विधानसभा, लोकसभा एकाचवेळी घ्याव्यात

Published On: Dec 19 2017 1:57AM | Last Updated: Dec 19 2017 12:16AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत मिळालेल्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना जाते, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. देशातील सर्व राज्यांतील विधानसभा, लोकसभा निवडणुका एकाचवेळी घ्याव्यात, असे भाजपचे मत आहे. उठसूठ निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या नावाखाली राज्यातील विकासकामांच्या वेगाला अडथळा येतो. एकत्र निवडणूक घेतल्यास निवडणूक खर्चही कमी होईल व वेळही वाया जाणार नाही. मात्र, याचा अर्थ गोव्यातील विधानसभा निवडणूक मुदतीपूर्वी होतील, असा अर्थ कोणी काढू नये. राज्यातील भाजप आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असेही पर्रीकर यांनी सांगितले. 

गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटीचा गुजरातच्या निवडणुकीवर परिणाम झाला नाही. गुजरातमध्ये सौराष्ट्रातील ग्रामीण भागातील अपवाद वगळता सर्व शहरी भागांतील जनतेचा भाजपला पाठिंबा मिळाला. गुजरातमधील 54 टक्के शहरी भागांतील मतदारांचा भाजपला पाठिंबा मिळाला आहे.
सत्तेत 22 वर्षे राहिल्यानंतर कितीही चांगले काम केले तरी विद्यमान सरकार विरोधात वातावरण बनतेच. काँग्रेसने पाटीदार समाजाचे नेते व अन्य घटकांशी हातमिळवणी करून भाजपला पराभूत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

गुजरात राज्यातील निवडणुकीबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे जनतेशी किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे या निकालाने सिद्ध झाले. मोदी यांच्या  नेतृत्वावर गुजरातच्या जनतेचा अजूनही विश्‍वास कायम आहे.