पणजी ः प्रतिनिधी
आपल्या शब्दांतून नव्हे तर आपल्या कृतीतून शांती, प्रेम आणि एकतेचा संदेश देऊ, असे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजेच नाताळ सण सोमवारी साजरा होत आहे, त्यानिमित्त गोमंतकीयांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
देव माणसात आहे आणि प्रत्येकात आपण देवाचा पुनःपुन्हा शोध घेतला पाहिजे. खास करून गरीब लोकांना सहकार्य केले पाहिजे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण एका नव्या दुनियेत प्रवेश करत असतो. या दुनियेत केवळ प्रेम आहे आणि वर्ण, रंग, पंथ याचा विचारही नाही. यंदाच्या नाताळात आपण प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान निर्माण करुया, असे आर्च बिशप फेर्रांव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, नाताळनिमित्त राज्यभरातील चर्चमध्ये येशू जन्मानिमित्त प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रार्थना सभांमध्ये धर्मगुरु भाविकांना उपदेशपर संदेश देणार आहेत. नाताळनिमित्त चर्च परिसरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल आणि घरांघरांत येशू ख्रिस्ताच्या जन्मसोहळ्यावर आधारित लक्षवेधी व आकर्षक गोठे तयार करण्यात आले आहेत. पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चसमोर करण्यात आलेला आकर्षक गोठा यंदाही लक्षवेधी ठरला आहे. चर्चला सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.