Thu, May 23, 2019 15:05
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › देशात लोकशाहीसाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे

देशात लोकशाहीसाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे

Published On: Feb 12 2018 2:10AM | Last Updated: Feb 12 2018 2:00AMपणजी  :  प्रतिनिधी

भारताला लोकतंत्र मिळून 68 वर्षे झाली. तरी भारतीय घटनेत नमूद  सर्वात महत्त्वाचे तत्व समानतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. जातीयवाद, धर्मद्वेश, मुलतत्ववाद उग्र बनत चालला आहे. खर्‍या अर्थाने लोकशाही राबविण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, असे आवाहन  सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. गोपाला गौडा यांनी केले. ते मिरामार येथील साळगावकर कायदा महाविद्यालयात पार पडलेल्या अ‍ॅड. थालमन परेरा स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते.

घटनात्मक लोकशाही वेगळी आणि संविधानात्मक लोकशाही वेगळी असे सांगताना संसदेने लेखी स्वरुपात कायद्याच्या रुपाने दिलेली लोकशाही कागदावरच आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने खर्‍या अर्थाने लोकशाही अस्तित्वात नसल्याचे ते म्हणाले. भारतीय घटनेच्या प्रस्तावनेतच नमूद केलेले सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे समानता याचा खरा अर्थ समान संधी खरोखर प्रत्येक भारतीयाला समानसंधी मिळते का यावर विचार करा, असे त्यांनी सूचवले. अजुनही महिलांना राजकारणातील स्थानासाठी झगडावे लागते. राखीवतेचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो. वास्तविक पाहता गेल्या 68 वर्षांनंतरही भारतात समानता आलेली नाही,असे ते म्हणाले.

दिवसेंदिवस नवनव्या कायद्यांची भर पडत आहे. जुने कायदे दुरुस्त होत आहेत,पण अजूनही या कायद्यांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. भारतीय घटनेचा आराखडा पाहिल्यास तो समानता, निधर्मीपणा, सर्वभौमत्व व सामाजिकता या चार तत्त्वांवर आधारलेला आहे. या रचनेला धक्का पोचू द्यायचा नाही. त्याचे महत्व जपले  गेले पाहिजे, असे ते म्हणाले. गोव्यात अजूनही पोर्तुगीज कायदे अस्तित्वात आहेत हे कसे काय, असाही प्रश्न न्या. व्ही गोपाला गौडा यांनी केला.हे पोर्तुगीज कायदे अजूनही भारतीय घटनेच्या चौकटीत बसत आहेत,की नाही ते आपल्याला माहीत नाही. पण कालबाह्य झालेल्या काही गोष्टी सोडून द्यायला हव्यात, असेही ते म्हणाले.