Sat, Jul 20, 2019 21:25होमपेज › Goa › सुखी, निरोगीसाठी योगाचा प्रसार : ब्रह्मेशानंदाचार्य

सुखी, निरोगीसाठी योगाचा प्रसार : ब्रह्मेशानंदाचार्य

Published On: Feb 04 2018 2:16AM | Last Updated: Feb 04 2018 2:14AMपणजी ः प्रतिनिधी

जगाला संस्कृतीसंपन्न गोव्याची खरी ओळख करून देणे आणि योग साधनेचे महत्व पटवून देणे हा विश्‍व योग सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. गोवा परशुरामाची भूमी, सांस्कृतिक वारसा व परंपरेने समृद्ध असून शांती आणि सलोख्याची परंपरा येथे नांदत आहे. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असून अतिथी देवो भव ही गोव्याची संस्कृती आहे. देश विदेशातील पर्यटकाला आदरातिथ्य आणि सुरक्षेची खात्री करून देणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. सुखी, निरोगी बनविण्यासाठी योगाचा प्रसार करीत आहे, असे प्रतिपादन सद‍्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले. जागतिक योग समुदाय अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय सद्गुरु फाऊंडेशन भारत आयोजित विश्व योग महोत्सवानिमित्त मिरामार समुद्र किनार्‍यावर  गोव्यातील महिला पुरोहितांद्वारे महायज्ञ आणि योग साधना प्रात्यक्षिक कार्यक्रमांत ब्रह्मेशानंदाचार्य बोलत होते. 
विश्व योग समुदायाचे संस्थापक दिलीप कुमार थक्कपन यांच्या उपस्थितीत होते.

यावेळी राजयोग आणि हास्ययोग करण्यात आले. स्वामी गोपालनंदजींनी हास्ययोग प्रात्यक्षिके करून दाखविली. ब्र्रह्मेशानंदाचार्य म्हणाले, की योग बाहेरून नाही अंतरातून आहे, भारत देशाची परंपरा आहे. विश्व कल्याणाच्या अनुषंगाने ऋषीमुनींनी ज्ञानसंपदेची रचना केली आहे. योग साधनेच्या वरदानाने आज भारत संपूर्ण जगाला जोडण्यासाठी आणि सुखी निरोगी बनविण्यासाठी योगाचा प्रसार करीत आहे. केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, या विश्‍व योग कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारत आहे. ऋषीमुनींनी  सर्वांचे हित चिंतले आहे. हिंदुस्थानचे आम्ही राहू आणि दुसर्‍यांना ही सुखी राहू देऊ, हेच या देशाचे ब्रीद आहे. योग पहिल्यांदाच 170 देशांनी स्वीकार केला आहे.आयुष मंत्रालय प्रत्येकाचे आयुष्य जपण्याचे कार्य करीत आहे. योग घरोघरी पोहोचत आहे हे 
सुचिन्ह आहे.

योगाचार्य स्वामी शिवानंद सरस्वतीजी, यतीधर्मानंदजी, आत्मानंबीजी, बोधी चित्तनंदजी, डॉ.गोपालजी यांचा मानपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रीपाद नाईक यांचा आयुष्य मंत्रालयातर्फे आयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणार्‍या कार्यासाठी मानपत्र देउन सन्मान केला. गोमंतकात प्रथमच होणार्‍या या योग महोत्सवाला जगद्गुरु दिलीप कुमार थंकपनजी संस्थापक वर्ल्ड योगा कम्युनिटी ( अमेरिका), महामंडलेश्वर शिवानंद सरस्वतीजी (इटली),गुरु आनंद वितरंग, योगी आशुतोषजी (दिल्ली), स्वामी यतीधर्मानंदजी (ओडिसा), डॉ. गोपालजी अध्यक्ष ग्लोबल योग अलायन्स (दिल्ली), डॉ. गोपालचंद, मोहम्मद इम्रान अली (दुबई), निरंजन मूर्ती (बेंगलोर), अ‍ॅड. गुरूमाता ब्राह्मी देवीजी - सेक्रेटरी,आंतरराष्ट्रीय सद्गुरु फाऊंडेशन(गोवा) इ. महनीय मान्यवर उपस्थित होते. अस्ताला जाणार्‍या सूर्याला नमस्कार करून आणि भक्तिसंगीताने कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर गावस यांनी केले.