पणजी : प्रतिनिधी
महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्सेला पार्सेकर हिच्या मृत्यूस पोलिस उपनिरीक्षक कारणीभूत असून त्याला त्वरित सेवेतून निलंबित करावे, या मागणीसाठी शनिवारी प्रदेश महिला काँग्रेसने पणजी येथील पोलिस मुख्यालयावर धडक मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी काहीवेळासाठी त्यांनी पोलिस मुख्यालयाचे प्रवेशद्वारही अडवले. प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी यावेळी मागणीचे निवेदन पणजी पोलिस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांना सुपूर्द केले.
काँग्रेस कार्यालय ते पोलिस मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी अर्सेलाला न्याय द्या, अशी घोषणाबाजी केली. कुतिन्हो म्हणाल्या, वेर्णा पोलिस स्थानकातील महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्सेला हिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे मानसिक व शारीरिक शोषण केल्याने तिच्या मृत्यूस एक उपनिरीक्षक जबाबदार आहे. यापूर्वीदेखील एका महिला कॉन्स्टेबलने केलेल्या आत्महत्या प्रकरणात त्याचे नाव पुढे आले होते.
अर्सेलाने आत्महत्या केली नसून तिचा खूनच झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची नोंद खून म्हणून करावी. त्याचबरोबर संबंधित उपनिरीक्षकाची गुन्हा अन्वेषण विभागाने कसून चौकशी करावी. सदर प्रकरणी पुरावे नष्ट करू नये यासाठी त्याला त्वरित सेवेतून निलंबित केले जावे. पोलिस खात्यात अनेक महिला कॉन्स्टेबल असून त्यांचे त्यांच्या वरिष्ठांकडून शोषण होऊ नये. तसे होत असल्यास त्यांनी त्वरित त्याची तक्रार करावी. अर्सेलाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहिल, असा इशाराही त्यांनी दिला.
अर्सेलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून उपनिरीक्षकास सेवेतून निलंबित करावे या मागणीचे निवेदन पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग यांना प्रदेश महिला काँग्रेसकडून सादर करायचे होते. मात्र ते पोलिस मुख्यालयात उपस्थित नव्हते. महानिरीक्षक येत नाहीत, तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशारा देऊन कुतिन्हो यांनी पोलिस मुख्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करून प्रवेशव्दार अडवले. पोलिस उपअधीक्षक आल्बुकर्क यांनी यात मध्यस्थी करुन महानिरीक्षकांच्यावतीने मागणीचे निवेदन स्वीकारुन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा संपुष्टात आला.