Sun, Oct 20, 2019 02:25होमपेज › Goa › द्विपक्षीय चर्चेची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावी

द्विपक्षीय चर्चेची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावी

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:19PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

कर्नाटकला पिण्यासाठी म्हादईचे पाणी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतलेली द्विपक्षीय चर्चेची भूमिका चुकीची असून गोवा सुरक्षा मंच याचा निषेध करते. मुख्यमंत्र्यांनी   चर्चेसंदर्भातील भूमिका तात्काळ मागे घेऊन गोव्यातील लोकांची माफी मागावी, अशी  मागणी मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी रविवारी पणजीत पत्रकार परिषदेत केली. शिरोडकर म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेविरोधात राज्यभरात दि. 27  ते  30 डिसेंबर या कालावधीत पाच ठिकाणी मंचतर्फे आंदोलन केले जाणार असून पणजीतहीमोर्चाच्या माध्यमातून निदर्शने केली जातील. म्हादईप्रश्‍नी मागील अनेक वर्षांपासून लवादासमोर गोवा व कर्नाटकमध्ये लढा सुरू आहे.

मात्र, अचानक मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याबाबत यूटर्न घेऊन कर्नाटकशी द्विपक्षीय चर्चेची तयारी दर्शविली. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका ही लोकांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार आहे. दि. 20 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत म्हादईप्रश्‍नी बैठक झाली होती. या बैठकीत दबाव आल्यामुळेच कदाचित पर्रीकर यांनी ही भूमीका घेतली असावी, असे शिरोडकर यांनी सांगितले.  कर्नाटकात पुढीलवर्षी विधानसभा निवडणूक होणार असून तेथे भाजपला फायदा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हादई संदर्भात पर्रीकर यांनी आपल्या भूमिकेत बदल करून लोकांची माफी मागावी. अन्यथा, आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा शिरोडकर यांनी दिला. पत्रकार परिषदेस गोवा सुरक्षा मंचचे सचिव हरिशचंद्र नाईक व  सरचिटणीस आत्माराम गावकर उपस्थित होते.