होमपेज › Goa › नोबेल विजेत्यांना ऐकण्याची गोमंतकीयांना संधी

नोबेल विजेत्यांना ऐकण्याची गोमंतकीयांना संधी

Published On: Jan 06 2018 1:21AM | Last Updated: Jan 05 2018 10:57PM

बुकमार्क करा
पणजी :प्रतिनिधी

नोबेल पुरस्कारप्राप्त   मान्यवरांचे  विचार ऐकण्याची  संधी येत्या 1 ते 3 फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या  ‘नोबेल पुरस्कार विजेत्यांशी संवाद-2018’ या कार्यक्रमातून गोमंतकीयांना लाभणार असून पणजीसह मडगाव फोंडा येथे कार्यक्रम होणार आहेत. यात जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवलेल्या तज्ज्ञ,शास्त्रज्ञ, राजकारणी आदींशी चर्चा आणि चित्रप्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे.  ‘नोबेल पुरस्कार विजेत्यांशी संवाद-2018 (विज्ञानाचा जीवनावर होणारा परिणाम) ’ या नावाने होणारा हा मुख्य कार्यक्रम पणजीतील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात येत्या 1   फेब्रुवारी रोजी   होणार आहे.

   नोबेलप्राप्त मान्यवरांचा पहिला कार्यक्रम गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर गोव्यात होणारा हा देशातील दुसरा कार्यक्रम आहे.   केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच स्वीडनच्या ‘नोबेल मीडिया’ संस्थेशी महत्त्वाचा सामंजस्य करार  राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान  खात्याने गत नोव्हेंबर- 2017 मध्ये केला होता . कला अकादमीत 1 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रम होणार असून सहा नोबेल पुरस्कारप्राप्त विजेत्यांना प्रत्यक्ष पाहण्यास व त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

याचबरोबर, पाटो-पणजी येथील संस्कृती भवनमधल्या सभागृहात  प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पद्मश्रीने सन्मानित प्रा. के. विजय राघवन यांचे ‘विज्ञान आणि शिक्षणामुळे भारताचे झालेले परिवर्तन’ या विषयावर बीजभाषण होणार आहे. पणजीबरोबरच फोंडा येथील राजीव कला  मंदिर आणि मडगावातील रवींद्र भवन मध्येही विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. कला अकादमीच्या दर्यासंगमावर 1  फेब्रुवारीपासून 28 पर्यंत नोबेल पुरस्कार व विज्ञान या विषयावर खास प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. या कार्यक्रमाला देशातील सुमारे एक हजार अतिमहनीय व्यक्ती हजर राहणार आहेत. या यादीत अनेक केंद्रीय मंत्री, सचिव,शास्त्रज्ञ, केंद्रातील  वैज्ञानिक खात्याचे विविध अधिकारी ,शिक्षक उपस्थित राहणार आहेत. गोवा आणि देशभरातील सुमारे 600विद्यार्थीही या कार्यक्रम सहभाग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.