Sun, Nov 17, 2019 07:35होमपेज › Goa › सुपरस्पेशालिटी ब्लॉकमुळे गोमेकॉ ‘मेडिकल हब’ : मुख्यमंत्री 

सुपरस्पेशालिटी ब्लॉकमुळे गोमेकॉ ‘मेडिकल हब’ : मुख्यमंत्री 

Published On: Feb 14 2018 2:51AM | Last Updated: Feb 14 2018 2:18AMपणजी : प्रतिनिधी

सुमारे 500 खाटांच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकमुळे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) देशातील महत्त्वाचे मेडिकल हब बनणार आहे. गोमेकॉ देशातील अन्य सरकारी इस्पितळांमध्येच सर्वोत्तम आहे, असे नसून ते खासगी इस्पितळांशी यशस्वी स्पर्धा करू शकत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. येथील कला अकादमीच्या सभागृहात  गोमेकॉच्या  500 खाटांच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकचा शिलान्यास मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्रीकर बोलत होते. ते म्हणाले, की सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये विविध 11 रोगांवर उपचारासाठी यंत्रणा व मनुष्यबळ  उपलब्ध केले जाणार असून त्यासाठीचा  खर्च 800 कोटी होण्याची शक्यता आहे.

यामध्ये कॅन्सरच्या रुग्णांसाठी विशेष ब्लॉक बांधण्यासाठी सुमारे 44 कोटी रुपये केंद्राकडून मंजूर झाले आहेत. गोमेकॉच्या सर्वांगीण आरोग्य सेवेचा विचार करता गोमेकॉ ही सर्वोच्च दर्जाचे वैद्यकीय केंद्र  बनणार असल्याचा आम्हाला विश्‍वास  आहे. राज्याच्या रस्ता, पाणी, आरोग्य आदी साधनसुविधेचा विकास होण्यासाठी वर्षाला   राज्य सरकार सुमारे 1500 ते 2 हजार कोटी रूपये खर्च करते. मात्र, गोव्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकासप्रकल्पांसाठी  केंद्राकडून सुमारे 25 हजार कोटी रूपयांचा निधी मिळत आहे.

गोव्याच्या सुमारे 16 हजार कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाशी तुलना करता हे प्रमाण दीडपट आहे. केवळ केंद्राच्या सहाय्यामुळे आरोग्य, शिक्षण व अन्य क्षेत्रात देशातील एक आदर्श राज्य बनू शकते, असेही पर्रीकर म्हणाले. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, की  गोमेकॉचा दर्जा सुधारला आणि साधनसुविधामध्ये वाढ झाली की आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारांवर संधी उपलब्ध होणार आहे. गोव्याचे नाव वैद्यकीय पर्यटनातही आदाराने घेतले जाणार आहे.या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, लोकसभा खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर,  सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा, सांताक्रुजचे आमदार अतोनियो फर्नांडिस, कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश पांडे, गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक, वैद्यकीय संचालक डॉ. शिवानंद बांदेकर आदी  मान्यवर उपस्थित होते.