होमपेज › Goa › खाणी महिनाभरात सुरू करणे आवश्यक : लोबो

खाणी महिनाभरात सुरू करणे आवश्यक : लोबो

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 12:34AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण व्यवसाय किमान महिन्याभरात सुरू होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने खाणींचा लिलाव अथवा अन्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास हरकत नाही. खाण समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे उपसभापती मायकल लोबो यांनी विधानसभेत  सांगितले. राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणावरील चर्चेत लोबो बोलत होते. लोबो म्हणाले, की कधीकाळी खाण व्यवसाय हा राज्याचा आर्थिक कणा होता. मात्र,  आता त्याचे  अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यातील खाण अवलंबित, मच्छीमार, टॅक्सी चालक आदी सामान्यांना त्रास होणे योग्य नाही.

खासगी शॅक्स मालकांना अजूनही परवाने देण्यात आले नाहीत. रेंट अ बाईकचे प्रश्‍न अजूनही सोडवण्यात आले नाहीत. यासाठी सरकारने काम करणे गरजेचे आहे. पर्यटन क्षेत्र गोव्यात चांगले विकसित झाले आहे. मात्र, नेत्रावळीसारख्या अंतर्भागात जाणे महत्त्वाचे आहे. गावात साधनसुविधा उभारणे गरजेचे आहे. गोव्यात एक भव्य मनोरंजन पार्क निर्माण झाल्यास त्याचा सर्वांना फायदा मिळू शकतो. लोबो म्हणाले, की स्वच्छ भारत योजनेखाली     ‘नितळ गोवा’ योजना यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवी संघटनांनी गावागावात जाणे आवश्यक आहे.

गोवा 2 ऑक्टोबर-2018 पर्यंत हागणदारीमुक्त होण्यासाठी राज्यात सुमारे 25 ते 30 हजार  शौचालयांची गरज आहे. भाषा माध्यम विषय अजूनही प्रलंबित असून त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. कोकणी अथवा मराठी दोन्ही भाषांचा आम्हाला आदर आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांना मान्यता मिळायला हवी. पालकांनाच आपल्या पाल्याचे भाषा माध्यम ठरवण्याचा अधिकार द्या.