होमपेज › Goa › रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज : मुख्यमंत्री

रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज : मुख्यमंत्री

Published On: Feb 10 2018 1:30AM | Last Updated: Feb 10 2018 1:30AMपणजी : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख  शिक्षणाची गरज  आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करावे यासाठी योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.  सर्वांनाच सरकारी नोकरी मिळू शकत नाही ,असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  गोवा विधानसभेतर्फे पणजीतील  गोमंतक मराठा समाज सभागृहात  आयोजित ‘राज्य युवा संसद’ कार्यक्रमावेळी व्यक्‍त केले. राज्यातील महाविद्यालयांपर्यंत अमलीपदार्थांचे जाळे पसरलेले नाही, हे जरी सत्य असले तरी अंमलीपदार्थ राज्यातून समूळ नष्ट करण्यासाठी सरकारकडून कठोर धोरण राबवण्यात येत  आहे. अमलीपदार्थ प्रकरणी 170  जणांवर कारवाई करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या ‘राज्य युवा संसद’ या कार्यक्रमाचे सकाळी उद्घाटन झाले. त्यानंतर पत्रकार प्रमोद आचार्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी वरील  मत व्यक्‍त केले. पर्रीकर म्हणाले,  सरकारी नोकरी म्हणजे  काम न करता पगार मिळणार अशी अनेकांची समजूत आहे. त्याचबरोबर लग्‍नासाठी देखील सरकारी नोकरी हवी असल्याची उदाहरणे  दिसून येतात. सरकारी खात्यांमधील जर सर्व कर्मचार्‍यांनी कार्यक्षमपणे काम  केले तर सध्याच्या  एकूण कर्मचार्‍यांपैकी 60 टक्के कर्मचार्‍यांकडून कामे पूर्ण केली जाऊ शकतात.

शिक्षणानंतर पुढे काय करायचे याचे युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, केवळ 10 ते 12 टक्केच लोकांना सरकारी  नोकर्‍या मिळू शकतात.  सरकारी कर्मचार्‍यांची संख्या वाढवू शकत नाही. निवृत झालेल्या कर्मचार्‍यांच्या जागी केवळ अन्य कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.  खासगी क्षेत्रात  नोकरी करण्याची अनेकांची इच्छा केली. स्वयंरोजगारासाठी सरकारकडून मुख्यमंत्री रोजगार योजना असून त्याचा युवकांनी फायदा घ्यावा. या योजनेचा 7 हजार जणांनी फायदा घेत आपला व्यवसाय सुरू केला आहे.  काम लहान असो किंवा मोठे कुठलेही काम करताना लाजू नये. असे सांगून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवण्याकडे सरकार लक्ष देत असल्याचेही त्यांनी म्हटले.