Sat, Apr 20, 2019 10:03होमपेज › Goa › पक्षविरोधी कारवायांमुळेच हकालपट्टी

पक्षविरोधी कारवायांमुळेच हकालपट्टी

Published On: Mar 04 2018 1:24AM | Last Updated: Mar 04 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

शिवप्रसाद जोशी यांची शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदावरून करण्यात आलेली हकालपट्टी ही ते पक्षविरोधी कारवाया करत असल्याचे समजल्यामुळे करण्यात आली आहे. त्यामुळे जोशी यांनी विनाकारण  तथ्यहीन आरोप करू नयेत, असे शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट  केले.

कामत म्हणाले की, जोशी यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत  शिवसैनिक असल्याचे सांगून बाहेरच्या लोकांना आणले. शिवसेना पक्षाच्या कामासाठी जोशी हे वेळ देत नव्हते. पेडणे अर्बन बँकेतील आर्थिक  घोळामुळे त्यांना पक्षाच्या कार्यालयात येणे जमत नसल्याने पक्षश्रेष्ठींनीच त्यांच्या जागी दुसरा राज्यप्रमुख नेमण्यात येईल याची कल्पना त्यांना यापूर्वीच दिली होती.  

पक्षविरोधी कामांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे समजल्याने त्यांना   राज्यप्रमुख पदावरुन  हटवण्यात आले. जोशी यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार  परिषदेत पक्षाच्या प्रवक्त्या राखी नाईक प्रभूदेसाई यांच्यावर राजकीय आरोप केले असते तर समजू शकलो असतो. पण, त्यांनी वैयक्‍तिक आरोप  केले, हे निषेधार्ह आहे.

राखी नाईक प्रभूदेसाई म्हणाल्या,  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करण्यास मज्जाव करीत असल्याचा होणारा आरोप तथ्यहीन आहे. त्यात तथ्य असल्यास नेमका काय मज्जाव केला हे स्पष्ट करावे. जोशी यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आशा गावस या महिलेने आपल्यावर  वैयक्‍तिक तसेच आक्षेपार्ह टीका केली. या प्रकरणी तिच्या विरोधात पक्षातर्फे बदनामीचा खटला दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. केपे तालुका प्रमुख आलेक्सी फर्नांडिस व बार्देश तुलका प्रमुख परेश पानकर यावेळी उपस्थित होते.