होमपेज › Goa › मसाज पार्लर, स्पामधून ७ वर्षांत १७१ मुलींची सुटका

मसाज पार्लर, स्पामधून ७ वर्षांत १७१ मुलींची सुटका

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 8:30AMपणजी : प्रतिनिधी

मसाज पार्लर, स्पामध्ये क्रॉस मसाजच्या नावाखाली   तेथील  महिला कर्मचार्‍यांचे ग्राहकांकडून लैंगिक  शोषण होते. गोव्यातील विविध मसाज पार्लर, स्पामधून 2010 ते 2017 या सात वर्षांच्या कालावधीत 171 मुलींची सुटका केली. यात 134 भारतीय तर 37 विदेशी मुलींचा समावेश असल्याची माहिती ‘अर्ज’ संस्थेचे अध्यक्ष अरुण पांडे यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिली. मसाज पार्लर व स्पामधील क्रॉस मसाज सारख्या प्रकारांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी गोवा सार्वजनिक आरोग्य  कायद्यात  सरकारने दुरुस्ती करावी, अशी मागणीही यावेळी  पांडे  यांनी केली. पांडे म्हणाले, राज्यातील  अनेक मसाज पार्लर तसेच स्पामध्ये  क्रॉस मसाज अर्थात विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून मसाज केला जातो.

यातून तेथे काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांचे येणार्‍या ग्राहकांकडून  लैंगिक शोषण होते. स्पा मध्ये काम करण्यासाठी मुलींची मानवी तस्करीही केली जाते. ‘अर्ज’संस्था गोवा पोलिसांच्या मदतीने या मसाज पार्लर तसेच स्पामधून मुलींची सुटका करते. पुरुष ग्राहकांना क्रॉस मसाज करून घेण्याची सक्‍ती संबंधित मसाज पार्लर  किंवा स्पा चालकांकडून केली जात असल्याचे  पीडित मुलींकडून सांगण्यात येते. क्रॉस मसाजसाठी पार्लर तसेच स्पा बाहेरदेखील सेवा देण्याची महिला कर्मचार्‍यांवर सक्‍ती केली जाते.  सक्तीने काम करवून घेण्यासाठी महिला कर्मचार्‍यांचा पासपोर्ट जप्‍त करणे (विदेशी कर्मचार्‍यांच्या बाबतीत), पुरुष ग्राहकांकडून होणार्‍या लैंगिक छळाची तक्रार पोलिसांकडे करू न देणे, आदी प्रकार या मसाज पार्लर तसेच स्पा मालकांकडून केले जात असल्याचेही  उघडकीस  येत असल्याचे पांडे यांनी सांगितले.

राज्यातील मसाज पार्लर तसेच स्पा मध्ये क्रॉस मसाजच्या नावाखाली चालणार्‍या अनैतिक प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्यात दुरुस्ती करावी. सध्याच्या कायद्यात क्रॉस मसाजसाठी असलेली दंडाची तरतूद अत्यल्प असल्याचेही पांडे यांनी सांगितले. सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरीझमचे फा.साविओ फर्नांडिस व अर्ज संस्थेच्या  जयश्री मोरजकर यावेळी उपस्थित होते.