Tue, Mar 26, 2019 01:39होमपेज › Goa › सांताक्रुझ, सांतआंद्रेमधील गावे पीडीएतून वगळणार

सांताक्रुझ, सांतआंद्रेमधील गावे पीडीएतून वगळणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

ग्रेटर पणजी   पीडीएतून  सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील गावे  त्वरित वगळण्यात येतील. सदर गावे वगळण्याच्या तेथील ग्रामस्थांनी   केलेल्या मागणीची व त्यांच्या भावनांची दखल घेत हा निर्णय घेतल्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी पणजी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यापुढे ग्रेटर पणजी पीडीएत  केवळ ताळगाव व कदंब पठार याच भागांचा समावेश असेल. कदंब पठाराचा भाग वगळण्याची  मागणी  तेथील स्थानिकांनी केल्यास तो भागदेखील वगळण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री सरदेसाई म्हणाले की, सांताक्रुझ व सांतआंद्रेच्या आमदारांनी  त्यांच्या मतदारसंघातील गावांचा ग्रेटर पणजी पीडीएत समावेश करावा, अशी  मागणी केली होती. या मागणीच्या आधारेच या दोन्ही मतदारसंघांतील सांताक्रुझ, बांबोळी-कुडका, शिरदोण, आजोशी-मंडूर या गावांचा  त्यात समावेश करण्यात आला होता.  सांताक्रुझ व  सांतआंद्रेच्या आमदारांनी या मागणीसंदर्भात पत्रदेखील दिले  होते. त्यानुसार नगरनियोजन मंडळाने पीडीए स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या दोन्ही मतदारसंघातील गावांचा समावेश केल्याने तेथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध दर्शवला.

यावरुन संबंधित आमदारांनी पीडीएप्रश्‍नी स्थानिकांची बाजू समजून न घेता  सदरप्रश्‍नी  दिशाभूल केल्याचे दिसून आल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. सरदेसाई म्हणाले की, पीडीएत या गावांचा समावेश केल्याने तेथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने आमदारांनी  मत बदलले. या गावांचा पीडीएत समावेश केल्यास गावांना धोका निर्माण होईल, अशी भीती तेथील ग्रामस्थांनी व्यक्‍त केली. याबाबत ग्रामस्थांनी आपल्याला निवेदनदेखील सुपूर्द केले  होते. 

जनतेच्या भावना लक्षात घेता ग्रेटर पणजी पीडीएतून या दोन्ही मतदारसंघांतील सांताक्रुझ, बांबोळी-कुडका, शिरदोण, आजोशी- मंडुर ही गावे वगळण्याविषयी नगरनियोजन मंडळाची 9 एप्रिल रोजी बैठक होणार असून त्यात या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले जाईल. गोंय, गोंयकार, गोंयकारपण अशी गोवा फॉरवर्ड या पक्षाची भूमिका असून जनतेच्या हिताविरोधात जाऊन कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. गाव राखण्यासाठी त्याचा समतोल तसेच नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक असल्याचेही सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. 
 

 

 

tags ; Panaji,news,Santa, Cruz, Santandro, Villages, will,be, excluded,pda,


  •