Thu, May 23, 2019 04:24होमपेज › Goa › आघाडी सरकारला मगोच्या पाठिंब्याचे दिलेले पत्र बोगस

आघाडी सरकारला मगोच्या पाठिंब्याचे दिलेले पत्र बोगस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगो) अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गेले वर्षभर एकाधिकारशाही चालविली असून केंद्रीय समितीला विश्‍वासात न घेता ते निर्णय घेत आहेत. राज्यात आघाडी सरकार स्थापनेसाठी पक्षाच्या समर्थनाचे पत्र अध्यक्षांनी कोणालाही न विचारता कोणताही ठराव न घेताच राज्यपाल तसेच सभापतींना सादर केल्याचा गंभीर आरोप पक्षाचे सरचिटणीस तथा फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी केला.

येथील एका हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मामलेदार यांनी  पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांना ‘लक्ष्य’ केले. मामलेदार म्हणाले की, ढवळीकर यांनी पक्षात मनमानी कारभार  चालवला असून कोणालाही ते विश्‍वासात घेत नाहीत. पक्षाची हानी होईल म्हणून एवढे दिवस गप्प होतो. परंतु, आता नाईलाजाने तोंड उघडावे लागत आहे. अध्यक्षांनी पक्ष  हिताविरोधात 36 अपराध  केले  असून आपण त्यांची नोंद करून पुरावे  जमवले आहेत. ढवळीकर यांची ही एकाधिकारशाही 12 मार्च 2017 पासून सुरु झाली. केंद्रीय समितीवर 15 सदस्य आहेत, त्यापैकी कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवला आहे. योग्यवेळी आपण एकेका प्रकरणाचा भांडाफोड करणार आहोत. 

गतसाली अस्तित्त्वात आलेल्या भाजप आघाडी सरकारला नियमानुसार मगोपच्या कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावाची प्रत जोडून पाठिंब्याचे पत्र देणे अपेक्षित होते. मात्र, अध्यक्ष ढवळीकर यांनी कार्यकारिणीला तसेच मगोच्या तिन्ही  आमदारांनाही अंधारात ठेवून राज्यपालांना तथा सभापतींना सदर पत्र दिले. आपण स्वत: पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम पाहत असून सर्व कागदपत्रे व व्यवहाराची आपल्याला माहिती असल्याने बोगस पाठिंबा पत्रावर विद्यमान सरकार अस्तित्वात आले असल्याचे ठामपणे सांगत असल्याचे मामलेदार म्हणाले. 

मगोप भाजपमध्ये विलीन करण्याचा डावही 2012 पासून होता. आपल्यासारखे सच्चे मगोप्रेमी एकत्र आल्याने तो डाव आम्ही हाणून पाडला. ज्यांना या विलिनीकरणातून लाभ होणार होता, अशा व्यक्तीचे ते कारस्थान होते, असे मामलेदार म्हणाले. भाजपशी संबंधित असे गोवा सुरक्षा मंच, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदींना मगोपत प्रवेश दिला जात आहे. फोंड्यात केतन भाटीकर यांना प्रवेश दिला असून ते गेल्या विधानसभा निवडणुकीत गोसुमंचे पणजीतील उमेदवार होते. शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांना पक्षात घेतले आहे. अन्य पक्षातील लोकांना मगोपमध्ये प्रवेश देताना केंद्रीय समितीची परवानगी घेतलेली नाही. मगोपच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची कोणतीही ऑफर नाही. ढवळीकर यांनी ‘लिडर’ बनून रहावे ‘डिलर’ नव्हे, असा खोचक टोमणाही मामलेदार यांनी मारला. 
 

 

tags ; Panaji,news,Party, support, letter,government, formation,


  •