Tue, Apr 23, 2019 21:32होमपेज › Goa › पीडीए आठवडाभरात रद्द करा

पीडीए आठवडाभरात रद्द करा

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 11:04PMपणजी : प्रतिनिधी

विकासाच्या नावाने गोव्यातील गावे  नष्ट करणारे सर्व पीडीए सरकारने येत्या आठवड्याभरात रद्द करावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा ‘गोंयकार अगेन्स्ट पीडीए’ चे नेते आर्थुर डिसोझा यांनी दिला. ‘गोंयकार अगेन्स्ट पीडीए’च्या बॅनरखाली येथील आझाद मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यातील ज्या गावांचा पीडीएमध्ये समावेश करण्यात आला  आहे, ती गावे पीडीएतून वगळावीत असे नव्हे तर, पीडीएच रद्द करावा. नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करावी, गावच्या विकासाचा अधिकार ग्रामस्थांना द्यावा, प्रादेशिक आराखडा   2021 रद्द करावा अशा चार प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.    

डिसोझा म्हणाले, ग्रेटर पणजी पीडीएची  स्थापना  पर्यावरण परिणाम मूल्यांकन अहवालाशिवायच करण्यात आली. या पीडीएत सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील गावांचा समावेश केल्याने तेथील लोकांनी विरोध केल्यानंतर नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी ही गावे वगळण्यात येतील, असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्याबाबतची अधिसूचना अजूनही जारी केलेली नाही.  मग  सरदेसाई यांच्यावर विश्‍वास कसा ठेवायचा. गोंय, गोंयकार व गोंयकारपण, असे म्हणणारे सरदेसाई आता गप्प का आहेत. सरकारने पीडीएची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करावी. यासाठी त्यांना एका आठवड्याची मुदत दिली जात आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. पर्यायी उपोषणाचा मार्गही स्वीकारू, असा इशारा त्यांनी दिला.

नगरनियोजन कायदा 2009चे दुरुस्ती विधेयकाची अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नाही. ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदी बाबूश मोन्सेरात यांची नेमणूक करण्यात आली, ते मंत्री किंवा आमदारदेखील नाहीत. पीडीएला विरोध होत असतानाच सांताक्रुझ व सांतआंद्रेचे आमदार मात्र प्रत्यक्षात लोकांसोबत नसल्याची टीका त्यांनी केली. सांताक्रुझच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस म्हणाल्या,   पीडीएमुळे गावेच्या गावे नष्ट होत चालली आहेत,  पीडीए हा एक आजार आहे. पीडीए हा लोकांच्या  नव्हे तर राजकारणी व बिल्डरांच्या लाभासाठी आहे. सांताक्रुझ व सांतआंद्रेच्या आमदारांनी या दोन्ही मतदारसंघांतील गावांचा पीडीएत समावेश करावा, अशी मागणी सरकारकडे करून   लोकांचा घात केला, अशी खरपूस टीकाही त्यांनी केली.

गोवा फाऊंडेशनचे क्‍लाऊड आल्वारीस म्हणाले,  गोंयकार अगेन्स्ट पीडीएच्या या आंदोलनाला  गोवा फाऊंडेशनचा पूर्ण पाठींबा आहे. गावच्या विकासाचा अधिकार हा ग्रामसभांनाच असणे आवश्यक आहे.  नगरनियोजन कायदा हा घातक असून तो रद्द करावा, असे त्यांनी म्हटले. गोंयकार अगेन्स्ट पीडीएचे सचिव रामा काणकोणकर, फा. ब्रिटो,  इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे , गोवा बचाव अभियानच्या  सबिना मार्टीन्स व   अन्य यावेळी उपस्थित होते.

या जाहीर सभेला दीड हजारहून अधिक लोक उपस्थित होते. सांतआंद्रे, सांताक्रुझ, कांदोळी, ताळगाव, पणजी या पीडीएत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारसंघातील लोकांचा यात समावेश होता. मात्र   लोकांबरोबरच आहोत, असे विधान करणारे सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस व सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा मात्र प्रत्यक्षात  या सभेला फिरकलेच नाहीत.   ‘एक दो एक दो-पीडीए को फेक दो’ अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर अक्षरशः दणाणून गेला. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 

tags ; Panaji,news,PDA,government, canceled, next, week, City ,Planning, Act, Amendment,