Wed, Nov 14, 2018 13:00होमपेज › Goa › वाहतूक खात्याचे 61 अर्ज ऑनलाईन 

वाहतूक खात्याचे 61 अर्ज ऑनलाईन 

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:01AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

‘डिजिटल इंडिया’ मोहिमेंतर्गत  वाहतूक खात्याने विविध सेवांसाठीचे 61 अर्ज खात्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. या सेवांसाठीचे अर्ज मिळवण्यासाठी कार्यालयात ग्राहकांना रांगा लावाव्या लागणार नाही आणि निराळे शुल्कही भरावे लागणार  नाही, असे वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांनी सांगितले.  राज्यातील अनेक वाहतूक कार्यालयात वाढती गर्दी कमी करण्यासाठी सदर सेवा ऑनलाईन उपलब्ध  करण्यात येत आहे. जनतेला मैत्रिपूर्ण सेवा मिळावी आणि  अर्जाचे नमुने मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागू नयेत, यासाठी ही सेवा  सुरू करण्यात आली आहे. या अर्जांसाठी कार्यालयात माफक शुल्क आकारले जात असले तरी ऑनलाईन सेवेमुळे सदर अर्जांचे नमुने ग्राहकांना मोफत मिळणार आहेत.

यासंबंधी सर्व वाहतूक खात्याच्या सहाय्यक संचालकांच्या कार्यालयांना सोमवारी पत्रक पाठवण्यात आले आहे.  61 प्रकारच्या सेवांसाठी असलेले मोफत अर्ज 30 जून 2018 पर्यंत ऑनलाईन प्राप्त होणार असले तरी इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्राहकांसाठी सदर अर्ज माफक दरात कार्यालयात उपलब्ध  आहेत, असे  देसाई यांनी सांगितले. वाहतूक खात्याच्या सर्व सहाय्यक संचालकांना या 61 सेवांपैकी ज्या अर्जांना लोकांकडून मागणी अल्प स्वरूपात असते किंवा नसते, अशा अर्जांची वेगळी यादी करण्यासही सांगण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.