Thu, Jul 18, 2019 11:03होमपेज › Goa › आर्थिक विकास महामंडळाला मागील वर्षी ६०कोटींचा नफा

आर्थिक विकास महामंडळाला मागील वर्षी ६०कोटींचा नफा

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 02 2018 11:48PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

आर्थिक विकास महामंडळातर्फे बेरोजगार युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे. राज्यात उद्योजक तयार व्हावेत, यादृष्टीने अनेक योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक सहकार्य देऊन त्यांना उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न महामंडळाने केला आहे. सरकारी कर्ज योजनेंतर्गत आर्थिक सहकार्य केल्यानंतर महामंडळाला 2017 या वर्षात 60 कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कुंकळ्येकर म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत 6 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा या उद्देशाने या योजनेसाठी आवश्यक प्रक्रियाही सोपी करण्यात आली. कर्ज देण्याबरोबरच व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षणही महामंडळातर्फे देण्यात आले.

महामंडळाने दिलेल्या कर्जाची परतफेडीचा आकडाही वाढला असून 80 टक्क्यांवरून तो 93 टक्क्यांवर पोचला आहे. यावरून येथून मिळालेल्या कर्जाचा योग्य उपयोग होऊन त्यात लोकांना यश मिळत असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले. महामंडळातर्फे व्यावसायिक, सामाजिक योजनेेंतर्गत सुमारे 1.34 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात विद्यालयांमध्ये आवश्यक उपकरणे पुरविणे, पायाभूत सुविधांचा विकास व सामाजिक कल्याणकारी योजनांचा समावेश होता.  नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देऊन व्यवसाय, उद्योग क्षेत्राकडे वळविण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.

लवकरच नवोदित उद्योजकांसाठी ‘स्टार्टअप’ स्पर्धेची घोषणा देखील केली जाईल. नोकरी देणारे व नोकरीच्या शोधात असणार्‍यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही विविध उपक्रमांतून केला जात आहे.  राज्यातील युवकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले. तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आजच्या काळात फार महत्त्वाचे झाले असून महामंडळाचे याकडेही लक्ष आहे. युवकांच्या कौशल्य विकासावर भर देण्यासाठी राज्यात प्रशिक्षण अकादमी असावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले.