Sat, Nov 17, 2018 20:39



होमपेज › Goa › पणजी महापौर उमेदवारी; उदय मडकईकरांची माघार

पणजी महापौर उमेदवारी; उदय मडकईकरांची माघार

Published On: Mar 04 2018 1:24AM | Last Updated: Mar 04 2018 1:04AM



पणजी  : (प्रतिनिधी) 

पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) 14 मार्च रोजी होणार्‍या   महापौरपदासाठीच्या निवडणुकीच्या स्पर्धेतून  बाबूश मोन्सेरात गटाचे नगरसेवक  उदय मडकईकर यांनी वैयक्‍तिक कारणांसाठी  माघार घेतली आहे. मोन्सेरात गटातर्फे  मडकईकर यांचे महापौरपदासाठी नाव  निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी अचानक माघार घेतल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. महापौरपदाचा उमेदवार कोण असेल, हे आता  मोन्सेरातच ठरवणार आहेत.

पणजी मनपाच्या महापौरपदी असलेल्या सुरेंद्र फुर्तादा व उपमहापौरपदी असलेल्या लता पारेख यांचा एक वर्षाचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या दोन्ही पदांची निवडणूक 14 मार्च रोजी होणार आहे. मोन्सेरात गटातर्फे  महापौर पदासाठी  उदय मडकईकर तर  उपमहापौरपदासाठी अस्मिता केरकर यांची नावे जवळपास निश्‍चित करण्यात आली होती.

मोन्सेरात गटाच्या 14 नगरसेवकांनी या नावांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ज्या बैठकीत मडकईकर यांच्या नावावर एकमत झाले होते, त्या बैठकीवर विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो व त्यांच्या पत्नी नगरसेवक रुथ फुर्तादो यांनी बहिष्कार घातला होता. शनिवारी अचानक मडकईकर यांनी माघार घेत असल्याचे बाबूश मोन्सेरात यांची भेट घेऊन कळवले. वैयक्‍तिक कारणासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.