पणजी : प्रतिनिधी
पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी शुक्रवारी पणजी महानगर पालिकेचे 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 3.18 कोटी रुपयांच्या तुटीचे 52.88 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडले. कुठलीही करवाढ न करता पणजीवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न मनपाने केला आहे. सरकारी खात्यांना यापुढे घरपट्टी शुल्काऐवजी सेवा शुल्क लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार दोन सरकारी खात्यांनी सेवा शुल्क भरले आहे. घरपट्टीच्या एक तृतियांश इतके सेवा शुल्क सरकारी खात्यांना लागू केले जाणार आहे.
मनपा सभागृहात आयुक्त अजीत रॉय यांच्या उपस्थितीत महापौर फुर्तादो यांनी 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक मांडले. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात मनपाने 15 कोटी रुपये घरपट्टी शुल्क गोळा करण्याचे उदिष्ट ठेवले होते, त्यापैकी 11.50 कोटी रुपयांचा महसूल घरपट्टी शुल्काद्वारे गोळा केला आहे. उर्वरीत रक्कम येत्या काही महिन्यात वसूल केली जाईल. घरपट्टी थकवण्याचे प्रकार होत असल्याने प्रत्येक प्रभागांमध्ये संबंधित नगरसेवकांच्या मदतीने घरपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल. याशिवाय व्यापार्यांकडून साईनबोर्ड तसेच व्यापार परवाना शुल्क आकारण्यासाठीही मोहीम हाती घेतली जाणार आहे. पणजी शहरात दरवर्षी पावसाळ्यात गटारे तुंबण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे शहरातील गटार व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
रिलायन्स जिओ कंपनीकडून पणजी शहरात 8 कि.मी.अंतरात केबल टाकण्यासाठी रस्ता खोदाईची परवानगी देण्यासंदर्भातील प्रस्ताव मनपाला सादर करण्यात आला आहे. रस्ता खोदाईपोटी शुल्क आकारणी प्रति मीटर 2 हजार रुपये प्रमाणे तसेच मनपा मंडळाच्या मंजुरीनंतरच रिलायन्सला परवानगी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, दोनापावला येथे गॅस वाहिनीच्या कामासाठी संबंधित कंपनीकडून रस्ता खोदण्यासाठी कमी शुल्क आकारण्यात आल्याने या विषयावरूनही बैठकीत गोंधळ झाला.