पणजी : प्रतिनिधी
पणजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीतून अचानक विरोधी भाजप गटाने माघार घेतल्याने बाबुश मोन्सेरात गटाचे विठ्ठल चोपडेकर यांची महापौरपदी तर अस्मिता केरकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी (दि.14) केली जाईल. विरोधी भाजप गटाकडून महापौर व उपमहापौर पदासाठी मिनीन डिक्रुझ व पुंडलिक राऊत-देसाई यांची नावे निश्चित करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (दि.13) भाजपने अचानक निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. संख्याबळ अपुरे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मनपात सध्या मोन्सेरात गटाचे संख्याबळ 15 असून त्यांना विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो व त्यांच्या पत्नी रुथ फुर्तादो या दोन अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा लाभला आहे, तर विरोधी भाजप गटाचे 13 नगरसेवक आहे. भाजपने मनपा काबीज करण्यासाठी मोन्सेरात गटाच्या नाराज नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्न केला होता; परंतु हा प्रयत्न सफल न झाल्याने भाजपने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.