Thu, Nov 15, 2018 22:44



होमपेज › Goa › मिनिन डिक्रुझ, राऊत-देसाई यांची नावे भाजपतर्फे निश्‍चित

मिनिन डिक्रुझ, राऊत-देसाई यांची नावे भाजपतर्फे निश्‍चित

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:25AM



पणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी मिनिन डिक्रुझ आणि पुंडलिक राऊत-देसाई   यांची नावे विरोधी भाजप गटाकडून   सोमवारी (दि. 12) संध्याकाळी उशिरा झालेल्या बैठकीत निश्‍चित करण्यात आली. मात्र, ही दोन्ही नावे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे कळवणार असूृन, त्यांची मान्यता घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, मिनिन डिक्रुझ आणि पुंडलिक राऊत-देसाई यांची नावे निश्‍चित झाली असली, तरी महापौरपदासाठी कोण व उपमहापौरपदासाठी कोणाची उमेदवारी यावर ऐनवेळी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.

मनपाच्या 14 मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीत महापौरपदासाठी बाबुश मोन्सेरात गटाकडून विठ्ठल चोपडेकर,  तर उपमहापौरपदी अस्मिता केरकर यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक मनपाच्या सभागृहात  14 रोजी सकाळी 10 वाजता होणार  आहे. 

मनपात सध्या मोन्सेरात गटाचे संख्याबळ  15 असून, त्यांना दोन अपक्ष नगरसेवक विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो व त्यांच्या पत्नी रुथ फुर्तादो यांचा पाठिंबा लाभला आहे.  त्यामुळे मोन्सेरात गटाचे सध्याचे संख्याबळ 17 आहे. तर विरोधी भाजप गटाचे संख्याबळ 13  आहे.   

भाजपचे संख्याबळ मोन्सेरात   गटापेक्षा कमी असले, तरी मनपा काबीज करण्यासाठी भाजपकडून सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अपक्ष नगरसेवक असलेल्या फुर्तादो दाम्पत्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. मोन्सेरात यांच्याकडून महापौरपदासाठी अनुभवी नगरसेवकांऐवजी  केवळ दोन वर्षाचाच अनुभव असलेल्या विठ्ठल चोपडेकर यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याने  आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.