Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Goa › हरियाणा मुख्यमंत्र्यांची पर्रीकरांकडे तक्रार

हरियाणा मुख्यमंत्र्यांची पर्रीकरांकडे तक्रार

Published On: Feb 12 2018 2:22AM | Last Updated: Feb 12 2018 2:10AMपणजी : प्रतिनिधी  

उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेले उद‍्गार तसेच हरियाणातील पायाभूत सुविधांवर केलेल्या टीकेची हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गंभीर दखल घेतली आहे. खट्टर यांनी  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना फोन करून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.  मीरामार-दोनापावला मार्गावर एक पर्यटक बसच्या खिडकीमधून लघुशंका करतानाचा व्हीडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल घेऊन नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांकडूनच असे प्रकार अधिक घडतात.

हे पर्यटक म्हणजे पृथ्वीतलावरचा ‘मळ’ आहेत, असे म्हटले होते. गोव्यात गैर वागणार्‍या उत्तर भारतीयांना गोव्याचे हरियाणा बनवायचे आहे काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला होता.  हरियाणातही भाजपचे सरकार सत्तेवर आहे. परिणामी सरदेसाईंच्या विधानावरून हरियाणाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून अनेक राजकीय पक्षांनी सरदेसाई यांच्याविरुद्ध  नाराजी व्यक्त केली आहे.

याविषयी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही ट्वीटरवर दखल घेतली आहे. खट्टर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशीे संपर्क साधला असल्याची माहिती त्यांनी स्वत:च  व्टीट करून दिली आहे. ‘सरदेसाई यांच्या तोंडात प्रसार माध्यमांनी चुकीची वाक्ये टाकली असावीत, तसेच सरदेसाई यांना गुरगावमधील पूर्वीच्या अनियोजित पायाभूत सुविधांचा संदर्भ द्यायचा असावा’, असे पर्रीकर आपल्याशी  फोनवर बोलताना म्हणाल्याचेही खट्टर यांनी ट्वीट केले आहे.