होमपेज › Goa › गोव्यासह 4 राज्यांच्या खाण मंत्र्यांची 19 रोजी बैठक

गोव्यासह 4 राज्यांच्या खाण मंत्र्यांची 19 रोजी बैठक

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:54AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोव्यासह कर्नाटक, झारखंड व छत्तीसगड या राज्यांच्या खाणमंत्र्यांची बैठक येत्या शुक्रवार दि.19 रोजी गोव्यात होत आहे.  या चार राज्यांतील लिजांची मुदत संपत असलेल्या 348 खाण लिजांचा लिलाव, जिल्हा खनिज निधीचा विनियोग तसेच खाण क्षेत्रासमोरील आव्हाने, अनेक अडचणींबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या चार राज्यांना पत्र पाठवून या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. संबंधित राज्यांच्या खाणमंत्र्यांशी चर्चा करून तेथील खाण लिजांच्या लिलावासंदर्भात तयारी तसेच अन्य संबंधित बाबींचा आढावा घेतला जाईल. या बैठकीत केंद्राच्या पर्यावरण धोरणातील आवश्यक त्या सुधारणा आणि खाण व्यावसायिकांसमोर असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. खाण क्षेत्रातून आर्थिक विकास साधण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत रोजगार निर्मिती यावर भर दिला जाईल.

2020 साली लिलाव कराव्या लागणार असलेल्या  खाण लिजांची संख्या गोव्यातच जास्त आहे. देशभरातील 348 खाण लिजांची मुदत 31 मार्च 2010 रोजी संपत आहे. गोव्यात 2020 साली लिज मुदत संपणार्‍या तब्बल 160 लोह खनिज खाणींच्या लिजचा लिलाव करावा लागणार आहे. कर्नाटकात 45 तर झारखंडमध्ये 30 खाण लिजांचा लिलाव करावा लागणार आहे. अधिकृत माहितीनुसार, 1 जुलै 2019 पासून या खाण लिजांचा लिलाव करण्याची सूचना केंद्रीय खाण मंत्रालयाने राज्य सरकारला केली आहे.