Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Goa › खाणप्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला रवाना

खाणप्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला रवाना

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 05 2018 12:37AMपणजी  ; प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 16 मार्चपासून  खाणबंदी    लागू होणार असून या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ रविवारी (दि. 4) दिल्लीला रवाना झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली  हे  शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन खाणीवरील संकट दूर करण्यासाठी विनंती करणार आहे. मात्र, असे असले तरी खाण मालक मात्र खाणी बंद होणार  हे  लक्षात घेऊन मोठ्या  प्रमाणात  खनिज उत्खनन करीत आहेत. दरम्यान, केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे सध्या दिल्लीबाहेर असून ते 8 मार्च रोजी दिल्लीत येतील. त्यामुळे गोव्याच्या शिष्टमंडळाला तोमर यांची भेट घेता येणार नाही. यावेळी शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

खाण व्यवसायावरील संकट दूर करण्यासाठी सध्या सत्ताधारी पक्ष आणि नेत्यांनी आटापिटा चालविला आहे. मात्र, व्यावसायिकांचे हत जपण्यासाठीच हित खटाटोप चालविल्याचा आरोप  विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. पण  पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांना साकडे घालणे हा शेवटचा पर्याय म्हणून हे शिष्टमंडळ   दिल्लीला जात आहे. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, सभापती प्रमोद सावंत, आमदार नीलेश काब्राल, दीपक पाऊसकर, खाण संचालक प्रसन्न आचार्य व वरिष्ठ अधिकारी कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे.

केंद्रातील अन्य नेत्यांसमोर  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने गोव्याची बाजू राज्य सरकार मांडणार आहे. हे शिष्टमंडळ मंत्री नितीन गडकरी यांची सोमवारी (दि.5) सकाळी 10 वाजता भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. खाणींवर 2012 मध्ये बंदी घातल्यानंतर अशाचप्रकारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. जंतरमंतरवर खाण अवलंबितांनी धरणेही धरले होते. मात्र, त्याचा फारसा   परिणाम दिसून आला नाही किंवा केंद्र सरकारही तत्काळ निर्णय घेऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होत आहे. हे शिष्टमंडळ कोणती खबर आणेल याकडे खाण अवलंबितांच्या नजरा लागून आहेत.