Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Goa › खाणबंदी प्रश्‍नी तोडगा काढू 

खाणबंदी प्रश्‍नी तोडगा काढू 

Published On: Mar 14 2018 1:25AM | Last Updated: Mar 14 2018 1:25AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण पट्ट्यातील जनतेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न लक्षात घेता खाण बंदी प्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या गोव्यातील तिन्ही खासदारांना मंगळवारी (दि.13) दिल्‍लीत झालेल्या बैठकीत दिले, अशी माहिती राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांनी दिली.  सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात दिलेल्या निवाड्यानुसार  राज्यात 15 मार्चपासून खाण बंदी लागू होणार आहे. त्यामुळे खाण पट्ट्यातील जनतेत  तसेच  आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, अ‍ॅड. नरेंद्र सावईकर तसेच राज्यसभा सदस्य तथा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर या भाजपच्या तिन्ही खासदारांनी मंगळवारी दिल्‍लीत जाऊन शहा यांची भेट घेतली. खाणबंदीमुळे खाण अवलंबितांवर कोसळणार्‍या संकटाचा विचार करून  खाण बंदीप्रश्‍नी हस्तक्षेप करावा, अशी मागणी या तिन्ही खासदारांनी शहा यांच्याकडे केली, अशीही माहिती तेंडुलकर यांनी दिली.    

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मंगळवारी सकाळी 11 वाजता भेट घेण्यात आली. खाण बंदीच्या निर्णयामुळे गोव्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती त्यांना  देण्यात आली. खाण बंदीमुळे 2 लाख खाण अवलंबितांवर परिणाम होईल, अशी माहिती शहा यांना देण्यात आली शहा यांनी सर्व बाजू ऐकून घेऊन खाणबंदी प्रश्‍नी हस्तक्षेप करून लवकरात लवकर तोडगा काढू, असे आश्‍वासन दिल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.

अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले की, गोव्यातील खाण अवलंबितांना खाण बंदीचा फटका बसू नये, त्यांना दिलासा मिळावा यासाठी  केंद्र सरकारकडून विविध पर्यायांवर विचार केला जात असल्याचे शहा यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील खनिज उत्खनन इंडियन ब्युरो ऑफ माईन्स (आयबीएम)च्या देखरेखीखाली  गुरूवार दि.15 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु राहील. त्यानंतर  खनिज उत्खनन बंद राहील, असा सुधारित आदेश  खाण खात्याने 12 मार्च रोजी जारी केला  आहे.  

ना. गडकरी एप्रिलमध्ये गोव्यात

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोवा दौर्‍यावर येणार आहेत. खाण बंदीमुळे गोव्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच  खाण व्यवसायाशी संबंधित घटकांबरोबर गडकरी चर्चा करणार आहेत. मंत्री नितीन गडकरी तसेच खाण मंत्री तोमर यांची दिल्‍लीत सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर,  सभापती डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी भेट घेऊन खाण प्रश्‍नी चर्चा केली.

त्रिमंत्री समिती बैठकीत आज खाणप्रश्‍नी चर्चा 

त्रिमंत्री  सल्‍लागार समितीच्या बुधवार (दि.14) दुपारी 3 वाजता होणार्‍या बैठकीत खाण प्रश्‍नावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने  राज्यातील 88 खनिज लिजांचे परवाने रद्द केल्याने खाण प्रश्‍न निर्माण झाला असून या बैठकीत त्यावर व पुढील कृतीवर चर्चा होईल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी यासंदर्भात फोनद्वारे बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले.