Sun, Aug 25, 2019 19:49होमपेज › Goa › खाणबंदी परिणामाचा अहवाल द्या

खाणबंदी परिणामाचा अहवाल द्या

Published On: Feb 14 2018 2:51AM | Last Updated: Feb 14 2018 2:21AMपणजी : प्रतिनिधी

खाण परवाने रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर होणार्‍या परिणामाविषयी अहवाल देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास  सांगितले आहे. गरज वाटल्यास समक्ष येऊन भेट घेण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. कला अकादमी सभागृहात एका कार्यक्रमात बोलताना पर्रीकर यांनी सदर माहिती दिली. राज्यातील खाणी बंद करण्याबाबत  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या दुसर्‍या दिवशी आपल्याला पंतप्रधान मोदी यांनी स्वत: फोन करून चौकशी केली.

त्यानंतर मोदी विदेश दौर्‍यावर गेल्यावर आपल्याला पंतप्रधान कार्यालयाकडून खास फोनद्वारे या निर्णयाचा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर होणार्‍या परिणामाचा अहवाल देण्यास सांगण्यात आले. गरज पडल्यास आपली भेट घ्या, असा संदेशही देण्यात आला. मोदी यांच्या या भावनेचा आपल्याला व राज्याला फायदाच होणार आहे, असे पर्रीकर म्हणाले. 
पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना पर्रीकर म्हणाले की, राज्यातील खाणींबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व आमदार, राजकीय पक्ष आणि अन्य घटकांशी आपण चर्चा करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, येत्या 15 मार्चनंतर राज्यातील खाणी बंद कराव्या लागणार असल्या तरी उत्खनन करण्यात आलेल्या खनिजाची वाहतूक व निर्यात मार्चनंतर पावसाळा सुरू होईपर्यंत होऊ शकते.

खाण महामंडळ स्थापण्यास विरोध असला तरी ते आपले वैयक्‍तिक मत आहे. आपले मत म्हणजे अंतिम निर्णय नव्हे, असे सांगून पर्रीकर म्हणाले की,  खाणींच्या लिलाव करण्यावर अन्य पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. खाणीसंबंधी उचित निर्णय घेण्याआधी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष तथा अन्य घटकांशी आपण चर्चा करणार आहे. याआधी खाणी बंद झाल्यानंतर खाण अवलंबितांना देण्यात येणारे अनुदान पुन्हा सुरू करणार की नाही, याविषयी अर्थसंकल्पात अधिक माहिती आपण देणार आहोत.