होमपेज › Goa › महाराष्ट्राशी सामंजस्य करारासाठी प्रयत्न 

महाराष्ट्राशी सामंजस्य करारासाठी प्रयत्न 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोमेकॉत कोणत्याही परिस्थितीत परराज्यातील रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार नाहीत. या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  बुधवारी भेटून चर्चेद्वारे सामंजस्य करारासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या करारामुळे गोव्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मिरामार येथील  खासगी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राणे यांनी सांगितले की, आपण  सर्वात आधी गोव्याचा आरोग्यमंत्री आहे. गोव्यातील जनतेचा आणि खास करून गोमंतकीय रुग्णांच्या हिताचा आपण प्रथम विचार करणार आहे. यासाठीच गोमंतकीयांना मोफत उपचार मिळण्यासाठी ‘दीनदयाळ स्वास्थ्य विमा’ योजना अमलात आणली आहे. मात्र, परराज्यातील गरीब आणि शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार नाहीत, असा या योजनेचा अर्थ होत नाही.

महाराष्ट्र सरकारला त्यांच्या राज्यातील रुग्णांवर गोमेकॉत जर मोफत उपचार हवे असतील तर त्यांनी त्यासाठी स्वतंत्र निधीकोष तयार करावा, अथवा एखाद्या विमा योजनेखाली त्यांच्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत. यासाठी आपण हवी ती मदत द्यायला तयार आहे. महाराष्ट्रात दोडामार्ग येथे झालेले जनआक्रोश आंदोलन आणि गोव्याबाहेरील रुग्णांकडून आकारल्या जात असलेल्या शुल्काबाबत वृत्तपत्रांमधून येत असलेल्या बातम्यांच्या पार्श्‍वभूमीवर राणे म्हणाले की, परराज्यातील रुग्णांकडून शुल्क आकारणीचा विषय हा साधा असून त्यासाठी नाहक राजकारण केले जात आहे. 

महाराष्ट्रातील रुग्णांवर येणारा खर्च गोवा सरकारला मिळायला हवा.हे पैसे कोणत्या स्वरुपात आणि कसे वसूल करावेत यावर बुधवारच्या बैठकीत चर्चा होऊन तोडगा काढला जाणार आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशार्‍यावर बोलताना राणे म्हणाले, नीलेश राणे यांची दादागिरी गोव्यात चालू दिली जाणार नाही. ही मुंबई अथवा कळंगूटमधले त्यांचे हॉटेल नाही.गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण फडणवीस यांना भेटून तोडगा काढणार आहे.
 

 

 

 

tags : Panaji,news,Maharashtra, Reconciliation, agreement,Try, Vishwajeet, Rane,


  •