Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Goa › चुकीच्या तंत्राने, चुकीच्या दिशेने जाणे ही मोठी चूक

चुकीच्या तंत्राने, चुकीच्या दिशेने जाणे ही मोठी चूक

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:55AMपणजी : प्रतिनिधी

आयुष्यात यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी गती हवी असल्यास एकटे धावणे उत्तम. परंतु जर का आपल्याला या शिखरावर दूरवर पोचायचे असेल तर संघटित होऊन इतरांना सोबत घेऊन चालावे. अचूक तंत्र वापरून घेतलेल्या मेहनतीतून अपयश आले तर हरकत नाही परंतु चुकीचे तंत्र वापरून त्या गोष्टीसाठी दीर्घकाळ चुकीच्या दिशेने प्रयत्न करणे म्हणजे सर्वात मोठी चूकच समजावी, असे मत ब्रिटिश-भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलीमोरिया यांनी व्यक्त केले. 

कला अकादमीत सुरू असलेल्या 11 व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात गुरुवारी तिसर्‍या दिवशी करण बिलीमोरिया ‘ब्रेक्झीटच्या संदर्भातून भारत, ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या भवितव्यावर पारसी दृष्टिक्षेप’ या विषयावर बोलत होते. बिलीमोरिया म्हणाले, माणूस जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो त्यावेळी अनेकदा त्यात अपयशांना सामोरे जावे लागते. अपयशाला सामोरे जाऊन जिद्दीने पुन्हा शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करावेत की हार मानावी याच मानसिक परिस्थितीतून यशस्वी बाहेर पडण्याला ‘हिंमत’ लागते. आयुष्यात यश जेवढे मोठे असेल तेवढीच हिंमत बाळगावी लागणार हे तत्त्व कायम लक्षात ठेवावे.  एखाद्याचे नशीब चांगले होते, असे आपण म्हणतो. परंतु नशीब म्हणजे आपण घेतलेल्या अचूक निर्णयाला ज्यावेळी संधी मिळते तेच नशीब असते. कोणत्याही व्यवसायात विश्‍वास महत्त्वाचा.     

तो कधीही कुणाचाच तोडू नये व स्वत:वरचा कधीच ढळूनये, असेही बिलीमोरिया यांनी सांगितले. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात स्वत:ची चांगली छाप सोडायची असेल तर इतरांच्या विचारांपलीकडे जाऊन कसे वागता येईल यावर लक्ष द्यावे. व्यवसाय, उद्योग क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी जे आपण करीत आहोत ती गोष्ट करण्याचे तंत्र बरोबर अवलंबले आहे की नाही हे पडताळणे आवश्यक आहे. आपण ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहोत ती साध्य होण्यासाठी अवलंबलेला मार्ग अचूक ओळखला पाहिजे; कारण यावरुनच आपल्या जिंकण्यासाठी किंवा गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी वेळ ठरते. आपण आपल्या व्यवसायात सलग तीन वेळा अपयश पाहिले आहे. तिन्ही वेळा अपयशाची कारणे वेगवेगळी होती. परंतु त्या गोष्टींवर विजय मिळविल्यामुळेच आज आपण याठिकाणी आहे, असे बिलीमोरिया यांनी सांगितले.