Wed, Mar 20, 2019 03:16होमपेज › Goa › कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवले

कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवले

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:11AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

कर्नाटकच्या शासकीय यंत्रणेने म्हादई नदीच्या कळसा-भांडुरा जलप्रवाहावर कणकुंबी येथे बांध घालून गोव्याकडे येणारे पाणी प्रत्यक्षात कर्नाटकाच्या दिशेने वळवले आहे. कर्नाटकने अगदी खालच्या थराला जाऊन घाणेरडे राजकारण केले आहे. न्यायालयीन आदेशाचाही कर्नाटकाने अवमान केला आहे, गोव्याच्या अस्तित्वालाच हे आव्हान दिले असून आम्ही म्हादईचा लढा प्राणपणाने लढू, असे जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले.

कर्नाटक राज्याने म्हादई नदीचा प्रवाह अडवल्याच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी कणकुंबीत करण्यात आलेल्या बांधकामाची जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी व खात्याच्या अन्य अधिकार्‍यांसमवेत शनिवारी सकाळी कळसा-भांडुरा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मंत्री व पथकासमवेत मोठ्या प्रमाणात  पोलिस आणि खासगी सुरक्षा रक्षकांचा फौजफाटाही यावेळी नेण्यात आला होता.

मंत्री पालयेकर  म्हणाले, म्हादई नदीवर प्रत्यक्ष बांध बांधून पाणी कर्नाटकच्या दिशेने वळविले गेल्याचे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. न्यायालयीन आदेशला न जुमानता कर्नाटकाने युद्धपातळीवर केलेले हे बांधकाम अत्यंत संतापजनक असून त्याचा आपण निषेध करतो. कर्नाटक अत्यंत खालच्या थराचे राजकारण करत असून चालवलेले ‘कृष्णकृत्य’ बंद करून लवादाकडून अंतिम निकाल येेईपर्यंत कर्नाटकाने वाट पाहावी, असे आवाहनही पालयेकर यांनी केले. 

म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून तिचा प्रवाह रोखल्याने गोव्यातील लोकजीवन, जनमानस, पर्यावरणावर याचा विपरित आणि गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे. सुर्ल येथील धबधब्यावरही नजीकच्या काळात परिणाम होण्याची शक्यता आहे, असे पालयेकर म्हणाले. कर्नाटकाने असे बांधकाम खूप आधीपासून सुरू केले असले तरी त्याची गोव्याला आणि जलस्रोत खात्याला साधी कल्पनाही आली नाही. कर्नाटकाने एवढा मोठा बांध कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या माध्यमातून म्हादईच्या प्रवाहावर कधी बांधला तेच समजले नाही. आता यापुढे खात्याच्या अधिकार्‍यांचे एक खास  पथक नेमून दर आठवड्याला या बांधकामावर नजर ठेवली जाणार असल्याचे पालयेकर यांनी सांगितले.