Thu, Jul 18, 2019 02:13होमपेज › Goa › कदंब प्रवास चतुर्थीनंतर ‘कॅशलेस’

कदंब प्रवास चतुर्थीनंतर ‘कॅशलेस’

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 31 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कदंब परिवहन मंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्‍यांना लवकरच ‘कॅशलेस’ प्रवास करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. या सुविधेचा फायदा नियमित प्रवास करणार्‍या पासधारकांनाही होणार असून गणेश चतुर्थीनंतर कदंब बसेसमध्ये ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॅशलेस’ व्यवहाराला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. राज्यातील अनेक सरकारी खात्यातही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या असून त्यांनाही ग्राहकांकडून  चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशीच कॅशलेस सेवा कदंब बसेसमध्येही सुरू करण्यात येणार आहे, असे  घाटे म्हणाले.

कदंबच्या बसेसमध्ये आता कागदी पासऐवजी ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटीफिकेशन’     (आरएफआयडी) कार्डे वापरली जाणार आहेत. या कार्डसाठी प्रवाशाने रक्कम भरावी लागते. बसमध्ये चढताना तिकीट वा पासची नोंद करण्याऐवजी वाहकाकडे असलेल्या यंत्रामध्ये हे कार्ड ‘स्वाईप’ करावे लागणार आहे. ही सेवा पर्यटकांनाही सोयीची ठरणार असून जर कार्ड रद्द करायचे असेल तर त्यावरील शिल्लक राहिलेली रक्कम परत मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सदर कार्डाचा वापर करणार्‍यांना 10 टक्क्यांची सवलतही मिळणार आहे, असेही घाटे म्हणाले.

कॅशलेस सेवा चतुर्थीनंतर प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे. यासाठी पाच ठिकाणच्या पाच बसेसमध्ये स्वायपिंग मशिन उपलब्ध केली जाणार आहेत. ही यंत्रे वाहकांकडे दिली जाणार असून ग्राहकांच्या मिळणार्‍या प्रतिसादानंतर सदर योजना अन्य मार्गावरही लागू केली जाणार असल्याचे घाटे यांनी नमूद केले.