Tue, May 21, 2019 18:12होमपेज › Goa › जॅक सिक्‍वेरा यांचा पुतळा उभारण्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा

जॅक सिक्‍वेरा यांचा पुतळा उभारण्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा

Published On: Feb 04 2018 2:26AM | Last Updated: Feb 04 2018 2:23AMपणजी : प्रतिनिधी 

विधानसभा संकुलात जनमत कौलाचे नेते डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  खासगी ठराव मांडणार असल्याचे   राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले. या खासगी ठरावाला सर्व आमदारांनी आपला पाठिंबा द्यावा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेदेखील याला पाठिंबा देतील, असे आपल्याला  वाटते असेही त्यांनी म्हटले.  

आलेमाव म्हणाले,  गोव्याच्या जनमत कौलात  डॉ. जॅक सिक्‍वेरा यांची भूमिका  महत्वाची  होती.  त्यांनीच जनमत कौल आणला. यात जनमत कौलाला सर्व हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला. जर हा जनमत कौल झाला नसता तर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता.  डॉ. सिक्‍वेरा हे जनमत कौलाचे नेते आहेत. परंतु, कदाचित भेदभाव निर्माण करण्यासाठी पुतळा उभारण्यास विरोध केला जात आहे. त्यामुळे विधानसभा संकुलनात गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याशेजारी डॉ. सिक्‍वेरा यांचा पुतळा उभारावा. विधानसभेत  मांडल्या जाणार्‍या  खासगी ठरावावेळी  कोण या पुतळ्याच्या  समर्थनात आहे व कोण विरोधात हे स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा म्हणाले की, लोहिया मैदानावर नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई प्रमाणेच  बाणावली येथे  राष्ट्रवादीचे आमदार आलेमाव यांनी सभा घेऊन विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्‍वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार हा पुतळा उभारण्यात यावा. यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी 28 फेब्रुवारी रोजी आमदार आलेमाव हे खासगी ठराव मांडणार आहेत.  सिक्‍वेरा यांचा पुतळा उभारलाच पाहिजे. जनमत कौलामुळे गोवा महाराष्ट्रात विलीन न होता त्याची वेगळी ओळख राखली गेली.  राष्ट्रवादीचा डॉ. सिक्‍वेरा यांच्या पुतळ्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.