Wed, Feb 26, 2020 09:19होमपेज › Goa › रस्ता अपघातांचे प्रमाण  ५० टक्के कमी करणार

रस्ता अपघातांचे प्रमाण  ५० टक्के कमी करणार

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 11:31PM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण शून्य टक्के झाले पाहिजे. यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न चालू असून येत्या दोन वर्षांत निमसरकारी संस्थांच्या सहकार्याने अपघातांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी वाहतूक पोलिस खात्यातर्फे आयोजित ट्राफिक सेंटिनल बक्षीस वितरण कार्यक्रमात दिली.
पर्रीकर म्हणाले, पोलिसांप्रमाणे जागरूक लोक वाहन चालकांकडून वाहतूक नियमांच्या होणार्‍या उल्लंघनावर लक्ष ठेवत आहेत. यामुळे बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणार्‍या पार्किंगवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले आहे. वाहतूक नियमांसंदर्भात लोकांनी अधिक सजग रहावे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीवर अवलंबून असलेले सारे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण शून्य झालेच पाहिजे.

सेंटिनल योजनेंतर्गत लोकांकडून आलेल्या सुमारे 5 हजार तक्रारींची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली असून 3 हजार 494 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित तक्रारींची पडताळणी सुरू आहे. इमेलच्या माध्यमातून चलन देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सर्वाधिक गुण मिळवणार्‍यास ऑनलाईन पद्धतीने बक्षिसाची रक्कम पोहोचवली जाईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.
यावेळी पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, पोलिस वाहतूक उपअधीक्षक धर्मेश आंगले, पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक उपस्थित होते. डॅरियस फर्नांडिस बक्षिसाचे मानकरी सेंटिनेल योजनेत डॅरियस फर्नांडिस यांना सर्वाधिक गुण मिळाले असून त्यांना बक्षिसादाखल वाहतूक खात्यातर्फे 28 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. एकूण 20 जणांना बक्षिसे देण्यात आली.