Thu, May 28, 2020 17:16होमपेज › Goa › राज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन खनिज उत्खनन 

राज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन खनिज उत्खनन 

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 02 2018 11:59PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोव्याला 20 दशलक्ष टन  खनिज उत्खनन मर्यादा असली तरी गतसाली  2017 च्या मोसमात डिसेंबरअखेरपर्यंत राज्यात केवळ  6.8 दशलक्ष टन एवढेच खनिज उत्खनन झाले असल्याची माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा मानला जाणार्‍या खाण उद्योगावर सध्या मंदीचे सावट असल्याचे दिसत आहे. गतसाली गोव्यात जून महिन्यात सुरू झालेला मान्सून सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू राहिल्यामुळे खनिज व्यवसाय उशिरा सुरू झाला. त्यातच खनिजवाहू ट्रक मालकांनी वाहतूक दरवाढीसाठी   केलेल्या आंदोलनामुळे खनिज वाहतूक रखडली होती.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे उतरलेले दर, वाढते इंधन दर, निर्यात शुल्क आदींमुळे आता खाण व्यवसायात मंदी व्यापून राहिली आहे. राज्यात 7.8 दशलक्ष टन खनिज उत्खननाची अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात त्यात 1 दशलक्ष टन  उत्खनन घटले असल्याचे खाण खात्याच्या सूत्रांनी सांगितलेे. 

गोवा सरकारच्या खाण खात्याने एकूण 45 खनिज लिजांचे 2016 साली नूतनीकरण करून दिले असले तरी सांगे, सत्तरी व डिचोली या तालुक्यातील  केवळ बारा-तेरा खनिज खाणी सध्या कार्यरत आहेत. या  व्यतिरिक्त सत्तरी तालुक्यातील सोनशी येथे सुरू असलेल्या एकूण तेरा खनिज खाणींमुळे प्रदूषण पसरत असल्याचा दावा करून  ग्रामस्थांनी खाणींना विरोध केल्याने या प्रकरणी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला.  गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तेरापैकी बारा खनिज खाणी बंद केल्या आहेत. त्यामुळेही गोव्याच्या एकूण खनिज व्यवसायाने अद्याप म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. गोव्यातून फोमेन्तो, वेदांता-सेझा गोवा, तिंबलो व व्ही. एम. साळगावकर आदी महत्वाच्या कंपन्यांकडून विदेशात  जास्त प्रमाणात  खनिज माल निर्यात केला जातो.