Thu, Jul 18, 2019 10:51होमपेज › Goa › माजी मुख्यमंत्री कामतांसह सोळा जणांवर आरोपपत्र

माजी मुख्यमंत्री कामतांसह सोळा जणांवर आरोपपत्र

Published On: Feb 04 2018 2:26AM | Last Updated: Feb 04 2018 2:25AMपणजी : प्रतिनिधी

काडणेकर माईन्स खाण परवान्याचे बेकायदेशीरपणे नूतनीकरण केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह 16 जणांविरोधात राज्यातील खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.  सदर आरोपपत्र हे 700 पानी असून यात 16 आरोपी व 25 साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे. आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री कामत, वैकुंठराव काडणेकर, काडणेकर व कामत यांचे कुटुंबीय, खाण खात्याचे निवृत्त वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ  हॅक्टर डिसोझा, मॅगनम मिनरल्स प्रा.लि.चेे रविंंद्र प्रकाश व  प्रशांत साहू व मॅगनम मिनरल्स प्रा. लि. यांचा समावेश आहे. या घोटाळ्यामुळे  सरकारी तिजोरीला 135 कोटी रुपयांच्या महसुलाचा फटका बसला आहे.

खनिजाची चोरी, कटकारस्थान रचणे, तसेच सरकारी तिजोरीला फटका या मुद्द्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  खाण घोटाळ्याप्रकरणी कामत यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले हे दुसरे आरोपपत्र आहे. या खाणीशी संबंधित अन्य बेकायदेशीर गोष्टींचा एसआयटीकडून तपास केला जात आहे. माजी मुख्यमंत्री कामत यांनी दोन आयएएस अधिकार्‍यांच्या निरीक्षणाचे उल्लंघन करून खाण परवान्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया बेकायदेशीरपणे हाताळली. सदर प्रक्रिया ही कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे ठाऊक असूनदेखील ती हाती घेण्यात आली.

याचा फायदा काडणेकर यांनी घेत   मॅगनम मिनरल्स यांच्यासोबत करार केला व  खाण लिज त्यांच्या नावे केंद्र व राज्य सरकारची परवानगी न घेता  हस्तांतरीत केली, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या  खाण घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीला 135 कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागले, असे तपासावेळी चार्टर्ड अकाऊंटंट यांनी तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, काडणेकर खाणीत किती खनिज उत्खनन करण्यात आले याचा सर्व्हे केला नसल्याचे एसआयटी खाण खात्याच्या पोलिस सूत्रांनी सांगितले. एसआयटी पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत व उपनिरीक्षक सतीश पडवलकर याप्रकरणी तपास अधिकारी म्हणून काम पहात आहेत.