Sun, Jan 20, 2019 21:28होमपेज › Goa › गोवा हाऊसफुल्ल 

गोवा हाऊसफुल्ल 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सलग  पाच दिवस सुट्टी आल्याने   गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यात देशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने संध्याकाळच्यावेळी पणजीत वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या काही दिवसांतील दमट हवामानामुळे तसेच वाढत्या उकाड्यामुळे पर्यटकांनी समुद्रस्नानासाठी गर्दी केल्याचे चित्र राज्यातील सर्वच किनार्‍यांवर दिसून आले.

महावीर जयंतीनिमित्त गुरुवार दि.29, शुक्रवार दि.30 रोजी गुड फ्रायडे, दि.31 शनिवार  व  दि.1 एप्रिल रविवार आठवडा सुट्टी, तसेच सोमवार दि.2 एप्रिल रोजी आर्थिक वर्षाअखेरची सुट्टी अशा सलग पाच दिवस सुट्ट्या आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्याही परीक्षा संपत असल्याने  देशी पर्यटक  विकेंड साजरा करण्यासाठी गोव्यात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.  रस्त्यावरून पर्यटकांच्या झुंडी दिसून  येत आहेत. शहरी भागापेक्षा कळंगुट, कांदोळी, बागा, कोलवा,  बाणावली,  हरमल, मांद्रे या किनारी भागांमध्ये पर्यटक अधिक आहेत.

 विदेशी पर्यटक  बर्‍यापैकी गोव्यात आले असले तरी प्रत्यक्षात देशी पर्यटकांची संख्या अधिक आहे. राज्यात सध्या उकाडा वाढत  असल्याने या पर्यटकांची पावले समुद्रकिनार्‍यांकडे वळू लागल्याचे दिसत आहे.     संध्याकाळच्यावेळी किनार्‍यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर जुने गोवे येथील चर्च परिसरात, स्पाईस प्लांटेशनच्या ठिकाणीही पर्यटकांची वर्दळ दिसून येत आहे.

पणजी  येथील दयानंद बांदोडकर मार्गावर असलेल्या कॅसिनोंमध्ये, पर्यटक क्रुझ बोटींवर पर्यटकांची संध्याकाळच्यावेळी गर्दी होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहेत.   पर्यटकांकडून  वाहनांची पर्वा न करताच  रस्ता पार केला जात असल्याने या समस्येत अधिक भर पडत आहे.  पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता या ठिकाणी संध्याकाळच्यावेळी पोलिस कर्मचारी तैनात करणे  आवश्यक आहे. वाहतूक पोलिस तैनात नसल्याने वाहन चालकांना बराच त्रास जाणवत आहे. 
 


  •