Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Goa › काँग्रेस प्रदेशाध्यक्षाबाबत दहा दिवसांत निर्णय

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाबाबत दहा दिवसांत निर्णय

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 1:48AMपणजी : प्रतिनिधी

गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी  नव्या  नेत्याची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून  आमदारांकडून सूचना घेण्याचे काम सुरू झाले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव येत्या दहा दिवसांत जाहीर केले जाईल, असे काँग्र्रेसचे राष्ट्रीय नेते तथा गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी सांगितले.  डॉ. चेल्लाकुमार यांचे शुक्रवारी गोव्यात आगमन झाले. त्यांचा मुक्काम दोनापावला येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये असून शुक्रवारी त्यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे आमदार तसेच पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती.

प्रदेशाध्यक्ष पदाचा शांताराम नाईक यांनी नुकताच राजीनामा दिला असून सध्या अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस गिरीश चोडणकर, यतिश नाईक, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि रवी नाईक यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.      

डॉ. चेल्लाकुमार यांची विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार दिगंबर कामत, इजिदोर फर्नांडिस, नीळकंठ हळर्णकर तसेच माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, रमाकांत खलप यांच्यासह पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांनी भेट घेतली.  डॉ. चेल्लाकुमार म्हणाले की, पक्षाच्या सर्व आमदार, पदाधिकारी तसेच हितचिंतकांकडून आपण नव्या प्रदेशाध्यक्षाबाबतच्या अपेक्षा  तसेच त्याबाबतचे विचार ऐकण्याचे काम   करत आहोत. 

कवळेकर म्हणाले, अनेक नावे  चर्चेत आली असून त्यांच्या प्रत्येकाच्या आधीच्या कार्याबद्दल चर्चा करण्यात आली. काही व्यक्तींनी आपल्याला पक्षाच्या कामात अधिक  वाव देण्याची विनंती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी जे नाव निश्‍चित करतील, ते सर्वांना मान्य असेल. 

भाजप सरकार अपयशी : चेल्लाकुमार

भाजप आघाडी सरकार स्थापन होऊन एका वर्षातच जनतेला त्याची पात्रता समजली आहे. राज्य सरकारला चांगले प्रशासन देण्यात अपयश आले असून सरकारच्या अनेक निर्णयांमुळे गोमंतकीयांना  त्रास भोगावा लागत आहे. काँग्रेसकडे जरी 16 आमदार असले तरी सरकार पाडण्याचे काम आम्ही करणार नाही. मात्र, समविचारी पक्षांकडून काँग्रेसला पाठिंबा मिळत असल्यास नवे सरकार स्थापन करण्याची संधीही गमावणार नाही, असे काँग्र्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी सांगितले. 
 

tags : Panaji,news, Congress, state, president, decision,