Thu, Jul 18, 2019 04:27होमपेज › Goa › काँग्रेसचा सर्वपक्षीय शिष्टमंडळाला पाठिंबा

काँग्रेसचा सर्वपक्षीय शिष्टमंडळाला पाठिंबा

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 05 2018 12:34AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या कडव्या विरोधाला न जुमानता काँग्रेस विधिमंडळ गटाने रविवारी घेतलेल्या विशेष बैठकीत खाणप्रश्‍नी दिल्लीला जाणार्‍या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला. या ठरावामुळे आलेक्स रेजिनाल्ड एकाकी पडले. दरम्यान, या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेेते प्रतापसिंह राणे सर्दी- खोकल्याच्या त्रासामुळे सहभागी झाले नाहीत. तरी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर आणि थिवीचे आमदार निळंकठ हळर्णकर दिल्लीला रवाना झाले आहेत. 

विधिमंडळ गट बैठकीच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर होते. ते  म्हणाले की, खाणबंदीमुळे राज्यातील सुमारे 2 लाख लोकांच्या उपजीविकेचा प्रश्‍न जटील होणार असून त्याबद्दल पक्षाकडून सर्व ते प्रयत्न केले जाणार आहेत. सरकारकडून   15 मार्च नंतरही खाणी सुरू रहाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असून काँग्रेसने  या प्रयत्नातून मागे हटण्याचा प्रश्‍नच येत नाही.  या बैठकीत आमदार रेजिनाल्ड यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आपला विरोध असल्याचे सांगितले. मात्र, त्यावर रेजिनाल्ड यांना आणखी कोणाचाही पाठिंबा लाभला नाही. खाण समस्येचे वास्तव जाणून घेतल्याशिवाय त्यासंबंधी वक्‍तव्ये करू नका, असा रेजिनाल्ड यांना आ. प्रतापसिंह राणे यांनी इशारा दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.