Fri, Apr 26, 2019 16:06होमपेज › Goa › प्रभारी मुख्यमंत्र्याची गरज नाही : तेंडुलकर 

प्रभारी मुख्यमंत्र्याची गरज नाही : तेंडुलकर 

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 05 2018 12:45AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आरोग्य सुधारत असून ते सरकारच्या आणि भाजपच्या संघटनात्मक कार्यातही लक्ष घालत आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पर्रीकर यांनी आपल्या निवासातूनच प्रशासकीय कामकाज हाताळणे सुरू केले आहे. पर्रीकर अन्य मंत्र्यांशीही सतत संपर्कात  असून येणार्‍या काळात मंत्रिमंडळाची बैठकही ते घेणार आहेत. त्यामुळे राज्याला प्रभारी मुख्यमंत्री नेमण्याची गरज नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्‍त केले.  ‘गोमेकॉ’त पाच दिवस   उपचारांनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरूवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचारासाठी त्यांना पुन्हा मुंबईला नेले जाण्याची शक्यता आहे.

मात्र, सध्या प्रकृती स्थिर असल्याने ते दोनापावला येथील निवासातूनच फाईलींचा निपटारा करत आहेत. पर्रीकर सोमवारी चार तासांसाठी पर्वरीतील मंत्रालयात  दाखल होणार असून बुधवारी मंत्रिमंडळ बैठकही घेण्याची शक्यता असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. या विषयी तेंडुलकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, आपण व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पर्रीकरांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली व 25 मिनिटांच्या बैठकीत पर्रीकरांनी चांगले मार्गदर्शन केले. काँग्रेसने पर्रीकरांच्या ताब्यातील काही महत्वाची      

खाती दुसर्‍या मंत्र्यांकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, तशी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता नसून काँग्रेसच्या सल्ल्याचीही आम्हाला गरज नाही.  तेंडुलकर म्हणाले की, पर्रीकर मुंबईला इस्पितळात भरती झाल्यावर गोव्यातील हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती बांधवांनी केलेल्या प्रार्थनांमुळे आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे 22 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडण्यासाठी पर्रीकर  राज्यात येऊ शकले.  भाजप सरचिटणीस तानावडे म्हणाले की, पर्रीकर यांच्यासोबत संघटनेच्या कामाबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. ते महत्वाच्या फाईली हातावेगळ्या करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या विश्रांतीच्या सल्ल्यानुसार, ते लोकांना भेटत नाहीत. मात्र, त्यांच्या वैयक्‍तिक जीवनाबद्दल लोकांनी अफवा पसरवू नयेत.