Thu, May 23, 2019 14:23
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांवर मुंबईतच उपचार

मुख्यमंत्र्यांवर मुंबईतच उपचार

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वादुपिंडाला (पॅनक्रियाटिटीस) सूज आल्यामुळे ते मुंबईच्या लीलावती इस्पितळात वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. पर्रीकर यांच्यावर योग्यतर्‍हेने उपचार होत असून  ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रीकर मुंबईतच उपचारासाठी थांबणार असल्याचे दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर यांनी  रविवारी सांगितले.  मुख्यमंत्री पर्रीकर यांना  गुरुवारी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांना सौम्य ‘पॅनक्रियाटिटीस’  झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.

त्यांच्या स्वादुपिंडाला सूज असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असल्याचे माहितीपत्र सरकारने शनिवारी  प्रसृत केले होते. पर्रीकर यांची प्रकृती सुधारत असल्याचेही  सरकारचे म्हणणे आहे. खासदार सावईकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे, की  पर्रीकर यांना वैद्यकीय उपचारातून बरे होण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. सध्या त्यांचे लक्ष उपचारांवर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची फौज त्यांची चांगली काळजी घेत आहे. आम्ही पर्रीकर  यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करत आहोत. सावईकर यांनी पत्रकात नमूद केले नसले तरी मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता मावळली आहे. 

अफवा पसरवू नयेत : लीलावती इस्पितळ 

 मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या उपचाराबद्दल लीलावती इस्पितळाने  रविवारी अधिकृत पत्रक जारी केले. इस्पितळाचे उपाध्यक्ष अजयकुमार पांडे यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पर्रीकर यांच्या प्रकृतीबद्दल खोटीनाटी माहिती पसरवून अपप्रचार  केला  जात असल्याचे   निदर्शनास आले आहे. या  सर्व अफवांचे आम्ही खंडन करत असून कुणीही विनाकारण चुकीची माहिती पसरवू नये. पर्रीकर यांच्यावर योग्य उपचार सुरू असून ते उपचाराला प्रतिसाद  देत आहेत. 

पंतप्रधानांकडून पर्रीकरांची विचारपूस 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील लीलावती इस्पितळात रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच तेथील डॉक्टरांशी उपचाराबाबत चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल   सी. विद्यासागर राव यांनीही पर्रीकरांना भेटून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.